

Ajit Pawar Leaves Security Convoy: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या तीन दिवसांपासून रंगत होत्या. मात्र, काल रात्री या प्रक्रियेला अचानक खिळ बसली असून जागावाटप आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून ही युती फिसकटल्याचे समोर येत आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आज सकाळी अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून आपला सरकारी ताफा, पोलीस संरक्षण आणि पायलट कार तिथेच सोडून स्वतःच्या खाजगी गाडीने एकटेच निघून गेले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा पराभव करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावे, असा प्रस्ताव होता. सुप्रिया सुळे यांनीही सकारात्मक संकेत दिले होते. मात्र, शरद पवार गटाच्या उमेदवारांनी 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवावी, ही अजित पवारांची अट शरद पवार गटाला अमान्य झाल्याने ही चर्चा फिस्कटली. काल रात्री महाविकास आघाडीच्या झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमधील दरी अधिकच स्पष्ट झाली.
अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. मात्र, युतीची चर्चा फिसकटल्यानंतर ते अचानक 'नॉट रिचेबल' झाले आहेत. ते कोणाला भेटायला गेले? पुन्हा एखादी गुप्त बैठक होणार का? की महापालिका निवडणुकीसाठी ते नवी रणनीती आखत आहेत? अशा प्रश्नांनी पुण्यातील राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण केला आहे.