Pune BJP Shiv Sena Seat Sharing: पुण्यातील जागा वाटपाचा फैसला थेट फडणवीस–शिंदे यांच्याकडे
पुणे: भाजप-शिवसेना युतीत जागा वाटपावरून तेढ निर्माण झाल्यानंतर आता पुण्यातील जागा वाटपाचा निर्णय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात होणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली असून, येत्या दोन दिवसांत या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महापालिका निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र येऊन लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोन्ही पक्षांच्या प्राथमिक बैठकीत शिवसेनेने भाजपला जागा वाटपाचा प्रस्ताव द्यावा, असे ठरले होते. त्यानुसार शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाजपकडे 35 ते 40 जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने अवघ्या 12 जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यावर शिवसेनेने नाराजी दर्शविल्यानंतर 15 जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली. मात्र, त्यावर शिवसेनेने थेट युतीतून बाहेर पडण्याचा पवित्रा दर्शविला होता. या सर्व घडामोडींचे पडसाद शुक्रवारी पुण्यात उमटले.
त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेला किती जागा द्यायच्या, यासंबंधीचा निर्णय होत नसल्याने आता जागा वाटपाचा चेंडू थेट मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे. यासंदर्भात पुण्याचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेनुसार, आता उपमुख्यमंत्री शिंदे यांना माहिती देऊन जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे सांगण्यात आले.

