Pune International Airport Pudhari
पुणे

Pune International Airport: पुणे विमानतळावरून परदेश दौऱ्याला वेग; वर्षभरात 87 हजार प्रवाशांची वाढ

आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्येही मोठी वाढ; दुबई, सिंगापूर, बँकॉकसाठी थेट सेवेला पुणेकरांची पसंती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या आर्थिक वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणेकरांचा परदेश दौऱ्याकडे कल वाढल्याचे स्पष्ट झाले असून, सन 2025-26 या आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत तब्बल 87,076 ने वाढ झाली आहे. विमानतळ प्रशासनाने नुकतीच ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे.

पुणे विमानतळावर पायाभूत सुविधांचा विस्तार आणि नवीन टर्मिनलच्या उपलब्धतेमुळे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या 2,52,728 वरून थेट 3,39,804 वर पोहचली आहे.

फक्त प्रवासीच नव्हे, तर विमानांच्या उड्डाणांमध्येही मोठी वाढ झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत 915 जादा आंतरराष्ट्रीय उड्डाणांची नोंद झाली आहे. पुणे हे आयटी आणि ऑटोमोबाईल हब असल्याने व्यावसायिक कारणास्तव परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहेच;

पण पर्यटन आणि शिक्षणासाठीही पुणेकर थेट पुण्यातूनच प्रवास करण्याला पसंती देत आहेत. दुबई, सिंगापूर आणि बँकॉक यांसारख्या शहरांसाठी वाढलेली थेट विमानसेवा या वाढीमागील मुख्य कारण मानले जात आहे.

पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आम्ही सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करीत आहोत. आर्थिक वर्षात 87,076 आंतरराष्ट्रीय प्रवासी वाढले असून, 915 जादा आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढली.
संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT