

पुणे: दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग येणार आहे. परंतु, यंदा प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागा आणि झालेली नोंदणी, यातील तफावत पाहता विद्यार्थ्यांनी नोंदणीकडेच पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रवेशाच्या रेकॉर्डबेक जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अकरावी प्रवेशासाठी गेल्या वर्षी राज्यात 9 हजार 535 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 15 हजार 165 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 44 हजार 67 जागा कोटा प्रवेशाच्या, अशा एकूण 21 लाख 59 हजार 232 जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी 14 लाख 79 हजार 654 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि जवळपास 9 लाखांवर जागा रिक्त राहिल्या.
यंदा मात्र नोंदणीमध्येच मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा 9 हजार 584 महाविद्यालयांत 17 लाख 12 हजार 513 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 4 लाख 79 हजार 523 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 92 हजार 36 जागा उपलब्ध आहेत. परंतु, त्यासाठी केवळ 8 लाख 26 हजार 173 विद्यार्थ्यांनीच नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उपलब्ध जागांच्या 30 टक्केच नोंदणी झाली असून, 70 टक्के जागांसाठी नोंदणीच झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविद्यालयांसह शिक्षण विभागाचीही वाढली चिंता
दि. 10 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करण्याची संधी देण्यात आली. तब्बल एक महिना उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांची अपेक्षित नोंदणीच झाली नाही. गेल्या वर्षी झालेली नोंदणी आणि यंदा झालेली नोंदणी, यातील तफावत पाहिल्यानंतर महाविद्यालयांसह शिक्षण विभागाची चिंतादेखील मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शून्य आणि पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेशाच्या शून्य आणि पहिल्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 8 मे ते 20 मेदरम्यान शून्य फेरी, तर शून्य फेरी संपल्यानंतर 21 ते 28 मेदरम्यान नियमित पहिली फेरी राबविण्यात येणार आहे. परंतु, नोंदणी कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाला नोंदणी वाढविण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.