

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदच आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणार असल्याचे रविवारी (दि. 10) झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.
पुढील बैठक येत्या 14 जून रोजी पुण्यात होणार असून, या बैठकीत साहित्य संमेलनाचे स्थळ ठरणार आहे. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून पुणे पुस्तक महोत्सव आणि पुणे नगर वाचन मंदिर यांच्याकडून सहआयोजकाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर या वेळी उपस्थित होते.
साहित्य महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष गुरय्या रे. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमण, महाळंक आणि निफाडकर यांनी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. स्वामी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी पुरुषोत्तम सप्रे (भोपाळ) यांची महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. तसेच, या वेळी साहित्य संमेलन स्थळ निवड समितीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांच्यासह प्रतिभा सराफ (मुंबई मराठी साहित्य संघ), रामचंद्र काळुंखे (मराठवाडा साहित्य परिषद) आणि लखनसिंह कटारे (विदर्भ साहित्य संघ) यांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेला मसापचे कार्यवाह सुनील महाजन आणि प्रसाद मिरासदार उपस्थित होते.
सोमण म्हणाले, की पुण्यात होणाऱ्या शंभराव्या साहित्य संमेलनाच्या स्थळाची 14 जून रोजी घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थळ निवड समितीची स्थापना रविवारच्या बैठकीत करण्यात आली. सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पोलिस मैदान (शिवाजी नगर), फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा विविध ठिकाणांची पाहणी या समितीकडून 12 आणि 13 जून रोजी केली जाणार आहे. त्यानंतर 14 जून रोजी स्थळनिश्चिती होईल. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून इच्छुक असलेल्या दोन संस्थांपैकी एका संस्थेची निवडही 14 जून रोजी निश्चित केली जाणार आहे. तसेच, स्वतंत्रपणे साहित्य महामंळाचे संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत झाला.
शंभराव्या साहित्य संमेलानानंतर होणार विश्व साहित्य संमेलन
संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सचिन इटकर यांच्या माध्यमातून दुबईतील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजय भांगे यांनी साहित्य महामंडळाला विश्व साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र, शंभरावे संमेलन पार पडल्यानंतर या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रस्तावावर निर्णय घेताना तेथील युद्धजन्य परिस्थिती आणि इतर माहितीचा आढाव घेतला जाणार आहे, असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी सांगितले.
सातारा संमेलनाच्या हिशेबासंदर्भात नव्याने पत्रव्यवहार
सातारा येथे झालेल्या 99 व्या साहित्य संमेलनाचे हिशेब अद्याप साहित्य महामंडळाकडे सादर झालेले नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कोषाध्यक्ष या नात्याने या संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि परिषदेचे माजी कोषाध्यक्ष यांना पत्र पाठविले होते. मात्र, अद्याप त्याला उत्तर आलेले नाही. आता साहित्य महामंडळाचा कोषाध्यक्ष या भूमिकेतून नव्याने पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, असे साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी सांगितले.