Pune Porsche Accident Case Pudhari
पुणे

Vishal Agarwal Bail: पोर्शे अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल पुन्हा अडचणीत; जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांची तयारी

व्हॉट्सॲप स्टेटसवरील कथित जल्लोषाच्या व्हिडिओवरून कारवाईची मागणी; जामिनाच्या अटींचा भंग झाल्याचा पोलिसांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कल्याणीनगर येथील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्‍डर विशाल अग्रवालच्‍या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर व्हॉट्सॲप स्टेटसवर कथितरीत्या जल्लोषाचा व्हिडीओ ठेवल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी मंगळवारी (दि. २३ जून) सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिली. याकरिता विधी व न्याय विभागाची परवानगी देखील मिळवल्‍याचे त्यांना सांगितले.

कल्याणीनगर येथील भीषण पोर्शे अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पुराव्यांशी छेडछाड व गुन्‍ह्यात सहभाग आढळल्‍यानंतर विशाल अग्रवालला अटक केली होती. नंतर सर्वोच्च न्यायालयाने काही कठोर अटींसह त्याला जामीन मंजूर केला होता.

जामिनाच्या अटींनुसार मृतांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे मानसिक किंवा शारीरिक त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. मात्र, जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत विशाल अग्रवाल आनंदोत्सव साजरा करताना दिसत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पुणे पोलिसांच्या तपासात संबंधित व्हिडीओ विशाल अग्रवालने स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवल्याचे समोर आले आहे. हा स्टेटस पाहिलेल्या दोन व्यक्तींचे जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. हे जबाब आणि उपलब्ध डिजिटल पुरावे न्यायालयासमोर सादर करून जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

जामिनाच्या अटींचा भंग केल्याचा मुद्दा कोर्टात मांडणार

दरम्यान, विशाल अग्रवाल याने हा व्हिडीओ २०२३ मधील जुना असल्याचा दावा केला होता. त्याचा जामीन मिळाल्यानंतरच्या कोणत्याही जल्लोषाशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी व्हिडीओ व्‍हायरल झाल्‍याची बाब गांभीर्याने घेतली आहे. व्हिडीओ जुना असला तरी तो जामिनानंतर लगेच स्टेटसवर ठेवणे हे मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावणारे कृत्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील संवेदनशीलता, देशभरात निर्माण झालेली चर्चा आणि मृतांच्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था लक्षात घेता जामिनाच्या अटींचा भंग झाल्याचा मुद्दा न्यायालयात मांडला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT