PMPML Pudhari
पुणे

PMPML Bus Breakdown: पीएमपी बस बेकडाऊनचे मोजमाप आता टक्केवारीत; अचूक विश्लेषणासाठी नवे नियोजन

वारंवार बंद पडणाऱ्या बसांवर नियंत्रणासाठी उपाययोजना; दर्जेदार स्पेअर पार्ट देण्याच्या ठेकेदारांना कडक सूचना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपीच्या ताफ्यातील बस रस्त्यात बंद पडण्याचे (बेकडाऊन) प्रमाण कमी करण्यासाठी त्याचे मोजमाप आता फक्त आकडेवारीत न करता ते टक्केवारीमध्ये मोजण्याचे नवे नियोजन केले जाणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दै.‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीच्या बस प्रवासादरम्यान वारंवार नादुरुस्त होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्येचे गांभीर्य ओळखून नूतन अध्यक्ष महेश आव्हाड यांनी पदभार स्वीकारताच बेकडाऊनच्या आकडेवारीचा सखोल आढावा घेतला.

सध्या बस बेकडाऊनची संख्या मोठी दिसत असली तरी, एकूण बस संचलनाच्या तुलनेत त्याचे नेमके प्रमाण किती आहे, हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे आता हे प्रमाण टक्केवारीत मोजण्याचे ठरवले आहे. यामुळे कोणत्या डेपोमध्ये किंवा कोणत्या मार्गावर बेकडाऊनचे प्रमाण जास्त आहे, याचे अचूक विश्लेषण करणे सोपे होणार आहे.

उच्च दर्जाचे स्पेअर पार्ट पुरवण्याच्या कडक सूचना देणार

बस बेकडाऊनचे प्रमाण मोठे असल्याचे पाहिल्यावर समोर येत आहे. त्याबाबतही आम्ही ठोस उपाययोजना करणार असून, ठेकेदारांनाही याबाबत योग्य त्या सूचना केल्या जाणार आहेत. तसेच, बस सातत्याने का बंद पडतात? कोणत्या डेपोच्या बस सर्वाधिक बंद पडतात? कोणत्या मार्गावरील बस बंद पडतात? बसच्या कोणत्या स्पेअर पार्टमध्ये जास्त समस्या येतात, याचाही सखोल अभ्यास केला जाणार आहे. तसेच, यानुसार स्पेअर पार्ट पुरवणारे वेंडर (ठेकेदार) यांना देखील उच्च दर्जाचे स्पेअर पार्ट पुरवण्याच्या कडक सूचना देणार आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले.

पीएमपीचा पदभार घेतल्यावर मी बेकडाऊनच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. ही संख्या सध्या अधिक दिसत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. फक्त संख्या न पाहता, टक्केवारीच्या माध्यमातून या समस्येचे विश्लेषण करून त्यावर ठोस उपाययोजना केल्या जातील.
महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT