

पुणे : राज्य सरकारने पणन विभागामार्फत हमीभावाने 14 जिल्ह्यांत मका खरेदी केला आहे. हा मका आता शिधापत्रिकांवरून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेबुवारीअखेर खरेदी करण्यात आलेला मका वितरित करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत. गव्हाच्या बदल्यात मका देण्यात येणार असून, प्राधान्य योजनेत प्रतिमाणसी मिळणाऱ्या धान्यात आता 2 किलो गव्हासोबत 1 किलो मका देण्यात येणार आहे, तर अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला 11 किलो गव्हासोबत 11 किलो मका देण्यात येणार आहे.
राज्य सरकार पणन विभागामार्फत हमीभावाने शेतकऱ्यांकडून मका खरेदी करीत आहे. हा मका प्रतिक्विंटल 2400 रुपये या दराने खरेदी केला जात आहे. राज्यात ही खरेदी 14 जिल्ह्यांमध्ये होत आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, बुलडाणा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात 9 मार्चपर्यंत 5 लाख 13 हजार 682 क्विंटल खरेदी केली आहे.
राज्य सरकारने हा मका आता पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिकांवरून वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात गव्हाऐवजी मका देण्यात येणार आहे. प्राधान्य योजनेतील ग््रााहकांना प्रतिमाणसी 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मिळतात. यात आता 3 किलो गव्हाऐवजी 2 किलो गहू आणि 1 किलो मका देण्यात येणार आहे. तर अंत्योदय योजनेत एकूण 35 किलो धान्य दिले जाते. त्यात 22 किलो गहू आणि 13 किलो तांदूळ दिला जातो. आता प्रत्येकी 11 किलो गहू आणि मका देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात 9 मार्चपर्यंत 8 हजार 827 क्विंटल मक्याची खरेदी केली आहे. हा मका सध्या बारामतीतील गोदामांमध्ये साठवून ठेवला आहे. हा मका बारामती आणि इंदापूर तालुक्यात वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. त्यात बारामती तालुक्यात अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या 7 हजार 988 इतकी आहे. या शिधापत्रिकांवर प्रत्येकी 11 किलो मका देण्यात येणार आहे, तर प्राधान्य योजनेत लाभार्थींची संख्या 3 लाख 30 हजार 157 इतकी आहे. या लाभार्थींना प्रत्येकी एक किलो मका देण्यात येणार आहे, तर इंदापूर तालुक्यात अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या 4 हजार 405, तर प्राधान्य योजनेतील लाभार्थिसंख्या 2 लाख 95 हजार 644 इतकी आहे.