

पुणे: ऐतिहासिक शनिवारवाड्याला तब्बल 198 वर्षांनी पुन्हा आगीच्या झळा बसल्या. ही वास्तू राष्ट्रीय वारसा हक्क यादीत असल्याने ही घटना खूप गांभीर्याने घ्यायला हवी अशीच आहे. या सात मजली वाड्याला 1828मध्ये आग लागून तो भस्मसात झाला असून, आता काही अवशेष उरले आहेत. ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व विभागाची आहे. मात्र, यात ते कमी पडत असून वाड्याभोवतीची सुरक्षा यंत्रणा चोख आणि दक्ष नसल्याचे दै. ’पुढारी’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
बुधवारी (दि. 12 मार्च) ऐतिहासिक शनिवारवाड्याला मागच्या बाजूने दक्षिणेकडच्या नारायण दरवाजाजवळच मोठी आग लागली. वाड्याला चहुबाजूंनी प्रचंड कचरा घाण अन् सरपणाच्या लाकडांचा वेढा असल्याने तेथे पुन्हा अशी घटना घडू शकते. सकाळीच ही आग लागल्याचे लक्षात येताच दोन अग्निशमन बंबांनी ती आग आटोक्यात आणली; मात्र, आगीचे लोळ इतके मोठे होते की मागच्या बाजूचा नारायण दरवाचा भाजून काळा झाला. त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने या दरवाज्याची युद्धपातळीवर डागडुजी सुरू झाली आहे. मागच्या बाजूला मात्र अजूनही सुरक्षारक्षक तैनात केलेले नाहीत.
या वाड्याभोवती प्रचंड कचरा, पालापाचोळा, घाण अन् सरपणाची लाकडं पडलेली दिसत आहेत. वाड्याच्या आत मागच्या बाजूला संगीत कारंज्याजवळील फणसाच्या झाडाजवळ कचऱ्याचा प्रचंड ढीग साचलेला आहे.त्यामुळे उरल्या सुरलेल्या या ऐतिहासिक वाड्याला अजूनही मोठा धोका आहे, हे दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी केलेल्या पाहणीत आढळून आले.
काय आहेत त्रुटी?
वाड्याच्या आत अन् बाहेर वाळलेल्या पालापाचोळ्याचे ढिगारे, कचरा अन् लाकडे अस्ताव्यस्त पडलेली आहेत.
मागच्या बाजूला एकही सुरक्षारक्षक तैनात नाही, त्याच ठिकाणी आग लागली.
मागच्या बाजूला उत्तररात्री दारुड्यांची भरते शाळा.
वाड्याच्या इमारतीसह, भिंती, दरवाजांची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे, तर वाड्यातील उद्यानाची जबाबदारी पुणे महापालिकेकडे.
एकूण 16 सुरक्षारक्षक, 4 ते 6 सफाई कर्मचारी तरीही साफ-सफाई नाही, सुरक्षेत अनेक त्रुटी आहेत.
काय आहे इतिहास
शनिवारवाड्याची पायाभरणी 10 जानेवारी 1730 मध्ये झाली, 1732 मध्ये सात मजली वाडा बांधला, यात बहुतांश भाग लाकडातील होता.
यात पाच दरवाजे आहेत. दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा.
1818 मध्ये बिटिशांच्या हाती येईपर्यंत हा वाडा मराठा सामाज्याचे प्रमुख राजकीय केंद्र होता.
सन 1828 मध्ये लागलेल्या विनाशकारी आगीनंतर, फक्त दगडी पाया आणि भव्य दरवाजे शिल्लक राहिले. तसेच प्रवेशद्वारावरचा काही लाकडी भाग सुरक्षित राहिला.
या संकुलात उत्कृष्ट कारंजे आणि सोळा पाकळ्यांचा कमळाच्या आकाराचे कारंजे होते.
हे स्थान राष्ट्रीय वारसा हक्क म्हणून घोषित असून, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या यादीत आहे. सुरक्षा अन् इमारतीची मुख्य जबाबदारी केंद्र सरकारकडे आहे. उद्यानाची सफाई यंत्रणा महापालिकेची आहे.
माझ्यावरच सुरक्षेची जबाबदारी आहे. आम्ही एकूण 16 सुरक्षा कर्मचारी आहोत. यात सात महापालिकेचे आहेत. आम्ही सर्व जण 24 तास पहारा देतो. आठ तासांची ड्युटी असून, तीन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक असतात. एकावेळी किमान चार जणांची ड्युटी आहे. त्या दिवशी मागच्या बाजूने आग लागली. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. आमच्या तत्काळ लक्षात आल्याने आम्ही अग्निशमन विभागाला माहिती दिली. नारायण दरवाजा वाचवता आला. त्याला झळा बसल्याने तो काळा पडला आहे. मात्र, पूर्ण जळाला नाही त्याची दुरुस्ती सुरू आहे. एका शिफ्टमध्ये चारऐवजी किमान आठ सुरक्षारक्षक हवेत. आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत ते वाढवले पाहिजेत.
ईश्वर कवडे, प्रमुख सुरक्षारक्षक, शनिवारवाडा