पांडुरंग सांडभोर
पुणे : पुणे महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची बाजारभावानुसार सध्याची किंमत (मूल्यांकन) जवळपास 35 हजार कोटी रुपये इतकी आहे. पहिल्यांदाच या मिळकतींचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामुळे नक्की किती रकमेची पालिकेची मालमत्ता आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून पालिकेची बाजारातील पत वाढण्यास मदत होणार आहे.
महापालिकेत गतवर्षी आणखी 23 गावांचा समावेश झाला. त्यामुळे पुणे ही आता भौगोलिकदृष्ट्या देशातील दुसर्या, तर राज्यातील पहिल्या क्रमाकांची महापालिका ठरली आहे. पुणे महापालिकेच्या विविध प्रकारच्या जवळपास 4 हजार मिळकती आहेत. या मिळकतींची बाजारातील नक्की किंमत किती, हे अद्याप कधीच काढण्यात आले नव्हते. आता मात्र पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने पहिल्यांदाच पालिकेच्या मिळकती आणि रिकाम्या जागा यांचे मूल्यांकन काढले असून, त्यांची एकूण किंमत 34 हजार 669 कोटी रुपये इतकी असल्याचे सहआयुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
ते म्हणाले, 'पालिकेच्या मिळकतींचे मूल्यांकन संबंधित भागातील रेडीरेकनरनुसार काढण्यात आले आहे. त्यात अनेक इमारती जुन्या आहेत. त्यामुळे सरसकट 12 टक्के इतका घसारा पकडून हे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. त्यात भवनच्या इमारती आणि रिकाम्या जागा, अॅमेनिटी स्पेस यांचे स्वतंत्र असे मूल्यांकम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित इमारतींचे एकूण क्षेत्र किती, याचा अहवाल पालिकेने तयार केला आहे.'
महापालिकेच्या मालकीच्या तब्बल 41 प्रकारच्या विविध स्वरूपाच्या मिळकतींची एकूण किंमत 17 हजार 883 कोटी इतकी आहे, तर त्यांचे एकूण क्षेत्रफळ 48 लाख 18 हजार 949 चौरस मीटर इतके आहे. या इमारतींमध्ये वसतिगृहे, दुकाने, फिश व भाजी मार्केट, नर्सरी, पार्क, ट्रक टर्मिनल्स यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या मालकीचे शहरात जे रिकामे भूखंड आहेत, त्यांची किंमत 16 हजार 786 कोटी इतकी आहे. त्यामध्ये पालिकेच्या ताब्यात आलेल्या अॅमेनिटी स्पेसचा समावेश आहे. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने प्रत्येक भागानुसार ही माहिती संकलित करून त्यांचे मूल्यांकन केले आहे.
महापालिकेच्या अनेक मिळकती आणि त्यांचे मूल्यांकन आतापर्यंत काढण्यात आले नव्हते. पहिल्यांदाच सर्व मिळकतींचा शोध घेऊन त्यांचे रेडीरेकनरनुसार मूल्यांकन काढण्यात आले. त्यामुळे पालिकेची बाजारातील पत मानांकन वाढण्यास मदत होईल.
– राजेंद्र मुठे, मालमत्ता व्यवस्थापन विभागप्रमुख