MNS Vs Shivsena : राज्यात अंधभक्तांचा सुळसुळाट; मुख्यमंत्र्यांचा मनसे-भाजपाला टोला

MNS Vs Shivsena : राज्यात अंधभक्तांचा सुळसुळाट; मुख्यमंत्र्यांचा मनसे-भाजपाला टोला
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : "राज्यात हल्ली अंधभक्तांचा सुळसुळाट झाला असून सगळीकडे उदोउदो सुरू झाला आहे. भक्त म्हणजे अंधभक्त नाही. अंधभक्तांचा हल्ली सुळसुळाट आहे. अंधभक्त काही काही वेळेला दैवत बदलू शकतो; पण भक्त हा आपल्या दैवताच्या विचारांवर आयुष्यभराची वाटचाल करतो", असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपाला लगावला.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या 'आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी कॉन्टेनपररी रिलिवन्स' या पुस्तकाचा प्रकाशन साेहळा वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबईवरून उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ घटनाच लिहिली असे नाही तर त्यांनी पुढे निर्माण होणाऱ्या अडचणी अडथळे दाखविले. त्या अडथळ्यांवर उपाय सूचविले. ज्ञानाचा अथांग सागर असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वकालीन मार्गदर्शक आहे. जेव्हा तुम्ही थांबता. काय करावे समजत नाही. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरतात".

यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे, अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठाचे प्रो. डॉ. केविन डी. ब्राऊन, अनुसूचित जाती आयोगाचे समन्वयक के. राजू व तामिळनाडूचे आमदार सिलिव्हम उपस्थित होते. "सामान्यत: राजकरणातील व्यक्तीमत्व अभ्यास करून काही लिहिले याबाबत शंका उपस्थित केली जाते. मात्र डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार वारशाला पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अभ्यासुपणे  बाबासाहेबांच्या विचारांवर पुस्तक लिहून राजकारणी अभ्यासू असतो हे दाखवून दिले आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि मंत्रीमंडळातील सहकारी म्हणून नितीन राऊत यांचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले", असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्‍या मनाेगतामध्‍ये  पुस्तकाचे लेखक डॉ. नितीन राऊत यांनी म्‍हटलं की, "लोकसंख्येच्या समस्येसंदर्भात बाबासाहेबांनी केलेले सुतोवाच लक्षात घेतले गेले नाही.  त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लोकसंख्या नियंत्रणावर ७० च्या दशकात धाडसी निर्णय घ्यावे लागले. बाबासाहेबांनी सुचवलेल्या मार्गंनी निर्णय घेतल्यामुळे १९५० च्या काळात १ लाख मुलांच्या जन्मामागे १ हजार महिलांचा प्रसूती दरम्यान वा पश्चात मृत्यू होत होता. मात्र आता दोन अपत्यांचा निणर्य घेतल्यामुळे ताजा आकडेवारीनुसार ही संख्या एक लाखाला 103 पर्यंत कमी झाली आहे", अशीही माहिती राऊत यांनी दिली.

"बाबासाहेबांची पुढील वर्षी १३२ वी जयंती साजरी करतांना अल्पउत्पन्न गटातील दारिद्य्ररेषेखालील कुटुंबानी एक अपत्यापर्यंत आपले कुटुंब सिमीत ठेवल्‍यास प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची योजना सुरू करण्याबाबत शासनाकडे आग्रह करण्यात येणार असल्याचेही त्‍यांनी  सांगितले. बाबासाहेबांनी लोकसंख्या नियंत्रणाचा विचार मांडण्याच्या घटनेला ८४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्याची आठवण म्हणून हे वर्ष लोकसंख्या नियंत्रण वर्ष म्हणून घोषित करण्यातबाबत मागणी आहे", असेही त्यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ : आयुष्यभर उपभोगली गेलेली शरीरं जेव्हा मृत्यूपंथाला लागतात 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news