पुणे

पुणे : कोरोनाच्या खास सभेबाबत महापालिकेत ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ ; सत्ताधार्‍यांसह विरोधकांना पडला विसर

मोनिका क्षीरसागर

पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात तातडीची कामे म्हणून६७ (३) क या नियमाखाली करण्यात आलेल्या विविध कामांवर आणि खरेदींवर चर्चा करण्यासाठी खास सभा बोलावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र ती हवेतच विरल्याचे पहायला मिळाले. वारंवार खास सभा घेण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारी आणि वारंवार चर्चा करण्याची मागणी करणारे विरोधक अशा दोघांनाही कोरोनाच्या खास सभेचा विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या अधिकारात६७ (३) क या नियमाखाली तातडीची कामे म्हणून विविध कामे व विविध साधन सामुग्रींची खरेदी केली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात कोटेशन व निविदांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. या काळात सीएसआरच्या माध्यमातूनही कोट्यवधींची खरेदी व कामे करण्यात आली.

रुग्णालय व कोवीड केअर सेंटरसाठी लागणारे साहित्य, औषधे, रुग्णांसाठी कपडे, फर्निचर, ऑक्सीजन निर्मितीसाठी प्रकल्प, जेवण, अशा विविध प्रकारच्या कामांना व निविदांना स्थायी समितीने मुख्य सभा मंजुरी देईल, या भरोशावर मान्यता दिली. स्थायीच्या मान्यतेनंतर कोट्यावधींची खरेदी व कामे करण्यात आली. मात्र, यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकांनीही अनेकवेळा मुख्यसभेत केला. तसेच यासंदर्भात सभागृहात माहिती देण्याची मागणीही केली. यावर प्रत्येकवेळी कोरोनावर खास सभा घेण्याचे व त्यात सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन सत्ताधार्‍यांनी दिले.

आता कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. सभासदांची मुदतही १४ मार्च रोजी संपत आहे. ठेकेदारांनी सुध्दा शंभर टक्के काम केले आहे. मुख्य सभेची मान्यता नसल्यामुळे त्यांचे काही प्रमाणात बिले राहिली आहेत. मात्र, कोरोनाच्या खास सभेला अद्याप मुहुर्त सापडलेला नाही. त्यामुळे कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप आणि यावर खास सभा घेण्याचे सत्ताधार्‍यांनी दिलेले आश्वासन दोन्ही हवेत विरल्याचे पहायला मिळत आहे.

कोरोनासंदर्भात खास सभा घेण्यात येणार होती. मात्र, राज्य शासनाने ऑनलाईन सभा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवरच ऑनलाईन सभा घेतली जाते. कोरोना संदर्भात अनेक सभासदांना बोलायचे आहे. त्यामुळे कोरोनाची खास सभा ऑफलाईन होणे गरजेचे आहे. राज्य शासनाने महापालिकेची सभा ऑफलाईन घेण्याची परवानगी दिल्याबरोबर कोरोनाची खास सभा घेतली जाईल.

गणेश बीडकर, सभागृह नेते, महापालिका

नागरिकांचे जीव वाचावेत, यासाठी आम्ही कोरोनाच्या काळात प्रशासनाने आणलेल्या विषयांना विरोध केला नाही. मात्र, सत्ताधार्‍यांनी याचा गैरफायदा घेवून शेकडो कोटींचा यात भ्रष्टाचार केला आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट संपल्यानंतर महापालिकेच्या सभा ऑफलाईन झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही चर्चा करण्याची मागणी केल्यानंतर गैरप्रकार बाहेर येतील म्हणून दरवेळी खास सभा घेण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात आम्ही राज्य शासनाकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. तसेच महापालिकेची ७ मार्च रोजी होणारी सभा ऑफलाईन घेण्यास परवानगी देण्याची मागणीही करणार आहोत.

प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT