पुणे: मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीचा टप्पा पार पडल्यानंतर आता मुलाखतीसह शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये संस्थाचालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी मुलाखतीसह निवड प्रक्रियेत गुणांचे निकष निश्चित करण्यात आले असून, संस्थाचालकांच्या हातात मुलाखतीसाठी केवळ १० गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची २७ हजार १४५ प्राधान्यक्रमांवर शिफारस झाली आहे.
संबंधित मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणी ३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही संस्थाचालकांनी पैशाची मागणी केली तर लाचलुचपत विभाग तसेच शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन देखील शिक्षण आयुक्तांनी केले आहे.
सहावी ते दहावीच्या पदांसाठी सर्वाधिक शिफारसी
मुलाखतीसह निवड प्रकारात इयत्ता पहिली ते पाचवीसाठी एक हजार ६०९ पदे उपलब्ध असून, चार हजार ४७८ प्राधान्यक्रमांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते आठवीसाठी चार हजार ५०५ पदांकरिता १० हजार ७९२, तर इयत्ता नववी ते दहावीसाठी चार हजार २१४ पदांकरिता ११ हजार ८८४ प्राधान्यक्रमांवर शिफारस झाली आहे. एकूण १० हजार ३२८ पदांसाठी २७ हजार १४५ प्राधान्यक्रमांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
तक्रारींसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीसंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित नमुन्यातील तक्रारी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra२०२५grcc@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया दृष्टिक्षेपात
मुलाखतीसह निवड प्रकारातील रिक्त पदे : १०,३२८
शिफारस झालेले उमेदवार : ११,४९३
शिफारस झालेले प्राधान्यक्रम : २७,१४५
मुलाखतीचा कालावधी : ३ ते २५ नोव्हेंबर
तक्रारींची अंतिम मुदत : ७ नोव्हेंबर