

पुणे: शुक्रवार म्हणजे नव्या चित्रपटांची पर्वणी! त्यात दिवाळीच्या मुहूर्तावर एकाच दिवशी सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होणे, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब. मात्र, या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळविण्यासाठी एकमेकांशीच नव्हे, तर दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटांशीही स्पर्धा करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये पुरेसे शो, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि व्यावसायिक यश मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे एकाच दिवशी सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होणे ही चित्रपटसृष्टीच्या विस्ताराची नांदी ठरणार की, प्रदर्शनाच्या नियोजनातील समन्वयाचा अभाव अधोरेखित करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना पुरेसे शो आणि प्राइम टाइमची वेळ दिली जावी, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.
शुक्रवारी (दि.२३) 'कापूसकोंडा', 'दशमी', 'मॅगझीन', 'मृत्युचक्र', 'सरपंच - द पॉवर मॅन' आणि 'लग्न आणि बरंच काही' हे सहा मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. मराठी चित्रपटांची निर्मिती वाढणे आणि त्यातून कलाकारांसह तंत्रज्ञांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. मात्र, एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यास प्रत्येकाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वाव मिळतो का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच दिवाळीच्या काळात मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये किती शो मिळतील आणि त्यांच्या व्यवसायावर त्याचा काय परिणाम होईल, याकडे लक्ष लागले आहे.
प्रदर्शनाच्या तारखांचे नियोजन करणे गरजेचे
या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी समन्वयाची यंत्रणा असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निर्माते, वितरक, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांच्या मालकांनी एकत्रित चर्चा करून प्रदर्शनाच्या तारखांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच, प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या तिकीटदरांचाही विचार व्हायला हवा. प्रत्येक चित्रपटाला पुरेसे शो आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची योग्य संधी मिळाल्यास मराठी चित्रपटांच्या व्यवसायालाही चालना मिळू शकते, असे निर्मात्यांचे, कलाकारांचे आणि चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चित्रपट निर्माते योगेश भोसले म्हणाले, शुक्रवारी आमचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा विषय आणि आशय पाहून चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल असे वाटते. मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होत असले, तरी प्रेक्षकांनी बजेटचा विचार न करता मराठी चित्रपटांना प्राधान्य द्यावे. मराठीत उत्तम चित्रपट येत आहेत. मराठी प्रेक्षकांसह अन्य भाषक प्रेक्षकांनीही मराठी चित्रपटांना यावे.
प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना प्राधान्य द्यावे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, आपला चित्रपट चांगला असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो योग्य वेळी प्रदर्शित होणेही महत्त्वाचे आहे. प्रत्येक चित्रपटाला पुरेसे शो, प्राइम टाइम आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली पाहिजे. चित्रपटाचा विषय आणि आशय पाहून प्रेक्षक त्याला प्रतिसाद देतात.
निर्माते थेट चित्रपट प्रदर्शित करू लागले
पूर्वी चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी महामंडळाचे पत्र आवश्यक होते. शासनाने हा निर्णय रद्द केल्यानंतर निर्माते थेट चित्रपट प्रदर्शित करू लागले. सध्या महामंडळाकडे केवळ चित्रपटाचे नाव, लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेच्या बॅनरची नोंदणी केली जाते. प्रदर्शनाची तारीख आणि वितरणाचे नियोजन निर्माते स्वतः करतात. पूर्वीप्रमाणे महामंडळाचे पत्र आवश्यक करणारा शासन निर्णय पुन्हा लागू करावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे, असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी सांगितले.