

पुणे: राज्यातील वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या राज्य कोट्यांतर्गत रिक्त राहिलेल्या एकूण १३८ जागांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विशेष प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांना नव्याने ऑनलाइन नोंदणीची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीच्या निर्देशांनुसार ही प्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
यापूर्वीच्या फेऱ्यांमध्ये जागा रिक्त राहिल्याने ही संधी निर्माण झाली आहे. नोंदणी प्रक्रिया २ नोव्हेंबरला सायंकाळी ७.३० पर्यंत ऑनलाइन नोंदणी शुल्क भरावे लागेल. रात्री ८ वाजेपर्यंत आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती प्रवेश पोर्टलवर अपलोड कराव्या .
विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरून घेणे गरजेचे
पात्रता अटींनुसार, एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीत जागा मिळाल्यानंतरही प्रवेश न घेतलेले, संस्थेत हजर न झालेले किंवा प्रवेश रद्द केलेले उमेदवार नव्याने नोंदणी करू शकतील. त्यांनी तिसऱ्या फेरीसाठी यापूर्वी नोंदणी केलेली नसावी. तिसरी फेरी किंवा त्यानंतरच्या मुक्त फेरीत जागा मिळालेल्या उमेदवारांना ही संधी उपलब्ध नाही.
जागा रिक्त राहिल्यास आणखी एक मुक्त फेरी राबविण्याची शक्यता आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरून सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावीत. कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी दि. ३ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. पुढील वेळापत्रक नंतर जाहीर होईल.