Paud CCTV Failure Pudhari
पुणे

Paud CCTV Failure: पौडमध्ये २३ लाखांची सीसीटीव्ही यंत्रणा ८ महिने 'धुळ खात'; नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न, केलेला खर्च वाया जाणार?

वीजपुरवठ्याअभावी ५० कॅमेरे बंद, गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अडथळा; व्यापारी संतोष क्षीरसागर अपघात प्रकरणात मदत नाही; विद्यमान सत्ताधाऱ्यांचा तत्कालीन नेतृत्वावर भ्रष्टाचाराचा संशय.

पुढारी वृत्तसेवा

पौड : तालुक्याचे शासकीय ठिकाण असलेल्या तसेच सतत वर्दळ असलेल्या पौड गावात ग्रामपंचायतीच्या वतीने तब्बल 23 लाख रुपये खर्च करून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा अपूर्ण आहे.

परिणामी केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिसांना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आवश्यक असलेली सीसीटीव्ही यंत्रणा पौडमध्ये ठप्प आहे.

तालुक्याचे शासकीय ठिकाण तसेच मध्यवर्ती ठिकाण हे पौड आहे. पुणे-कोलाड महामार्ग गावातून गेलेला असून रस्त्यावर सतत मोठी वर्दळ असते. बाजारपेठ, शाळा, बसस्थानक येथे नेहमीच नागरिकांची रेलचेल असते. इतर ठिकाणी अपघात झाल्यानंतर पळून जाणारी वाहने टिपण्यासाठी तसेच इतर गुन्हे उघडकीस यावेत या हेतूने पौड ग्रामपंचायतीने गावात 50 सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन केले होते.

यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित काम एका कंपनीला दिले होते. यासाठी 23 लाख रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करण्यात आला होता. यासाठी गावात सर्वत्र 50 सीसीटीव्ही बसविण्यात आले; मात्र ते वीजपुरवठ्याअभावी सुरू करण्यात आले नाहीत. मागील 8 ते 10 महिने हे कॅमेरे बसविलेल्या ठिकाणी धूळ खात पडलेल्या अवस्थेत आहेत. काही कॅमेरे लोंबत असून काही कॅमेरे चोरीला देखील गेलेले आहेत, तर काही कॅमेर्‌‍यांवर फ्लेक्सही लावण्यात आलेले आहेत.

दरम्यान आता ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने अनेक गुन्हे उकल होण्यास अडथळा येत आहे. ग्रामस्थांच्या भरलेल्या कराच्या रूपातून कामे करण्यासाठी पैसे उभे केले जातात. असे असूनही ग्रामस्थांचीच सुरक्षा धोक्यात आली असल्याचे मत अनेक ग्रामस्थ आणि व्यापारी बोलून दाखवत आहेत.

सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करणार

पौडमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेत आधीच्या सत्ताधार्‌‍यांकडून मोठा भष्टाचार झालेला असून तो उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही महत्त्वाचे असून ही यंत्रणा सुरू करण्यासाठी आमचे कंपनीशी बोलणे सुरू आहे. लवकरच पौड गावातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करू, असे सरपंच किरणकुमार आगनेन, उपसरपंच आशा जाधव, माजी उपसरपंच प्रिती आगनेन आणि मोनाली ढोरे यांनी सांगितले.

व्यापाऱ्याचे अपघाती निधन; चालकाचा पोबारा

पौड येथील व्यापारी संतोष क्षीरसागर यांना पायी जात असताना वाहनचालकाने जोरदार धडक दिली. यात त्यांचे निधन झाले. घटनेनंतर वाहनचालकाने पोबारा केला. सीसीटीव्ही बंद असल्याने संबंधित वाहनचालक मिळून आला नाही. त्यामुळेच सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बसस्थानकातील अपघातानंतर चालक फरार

पौड बसस्थानकात तीन महिन्यांपूर्वी एका वयस्कर महिलेला चारचाकीने जोरदार धडक दिल्यानंतर हा चालक पळून गेला. यामध्ये ही महिला जखमी झाली होती. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असती तर संबंधित चारचाकी चालकदेखील सापडला असता, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT