Patas DJ Police Action Pudhari
पुणे

Patas DJ Action: पाटसमध्ये कर्णकर्कश डीजे वाजविणाऱ्यांना पोलिसांचा दणका; तिघांवर गुन्हा, डीजे यंत्रणा जप्त

नागेश्वर मंदिरासमोर परवानगीविना मोठ्या आवाजात डीजे; वारंवार सूचना करूनही उपद्रव सुरूच

पुढारी वृत्तसेवा

पाटस: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने निर्धारित केलेल्या ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांना पाटस पोलिसांनी दणका दिला आहे. पाटस गावच्या हद्दीत नागेश्वर मंदिरासमोर मोठ्या आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक ठिकाणी नाचणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानगाव येथील संपूर्ण डीजे यंत्रणा पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे डीजेचालकांचे धाबे दणाणले आहेत. अविनाश बाबूराव जाधव (रा. कानगाव, ता. दौंड), गौरव बाळासोा माकर व अभिजित हनुमंत चव्हाण (दोघेही रा. पाटस, ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. ते पाटस येथील नागेश्वर मंदिरासमोर वाहन (एमएच ०४ एस ३६४) मध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवत होते.

कोणतीही आवश्यक वाद्य परवानगी न घेता सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवून नाचण्याचा प्रकार सुरू होता. वारंवार सूचना करूनही संबंधितांकडून उपद्रव सुरूच ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस हवालदार राजकुमार कोकरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा करून डीजेची संपूर्ण यंत्रणा जप्त केली. यात मोठे स्पीकर बॉक्स, ॲम्प्लिफायर, जनरेटरसह अन्य साहित्याचा समावेश आहे.

गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान निर्धारित ध्वनिमर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पाटस येथे करण्यात आलेली ही कारवाई त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवापूर्वी पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ध्वनिप्रदूषणाबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. निर्धारित वेळेत आणि निर्धारित ध्वनिमर्यादेतच ध्वनिक्षेपक वाजवावेत, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही यवतचे निरीक्षक संतोष तासगावकर आणि सहायक पोलिस निरीक्षक सुधीर कदम यांनी दिलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT