

नितीन पवार
कसबा पेठ: मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचा काथ्या, बांबू, शेण, सुतळी आणि द्रोणातून साकारला पर्यावरणपूरक गणेशोत्सव. पारंपरिक भारतीय कारागिरीची झलक. परंपरा जपूया निसर्गही जपूया हा संदेश देणारी ही पर्यावरण पूरक सजावट... श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान (हनुमान क्लब) यांचा सिमेंटच्या जंगलात लुप्त होत चाललेल्या वास्तू आताच्या पिढीला कळाव्यात, या संकल्पनेतून जुने पुणे देखावा... नवग्रह मित्रमंडळाचा जुन्नर येथील ऐतिहासिक श्री काळभैरवनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती...फणी आळी तालीम मंडळाचा शिवशाहीचा शिरस्ता अर्थात टोपीकर इंग्रज यांना शासन जिवंत देखावा... जनार्दन पवळे संघाचा नृसिंह आरूढ गणेशमूर्ती २८ फुटी भव्य देखावा... असे नावीन्यपूर्ण देखावे पाहण्यासाठी कसबा पेठेत पुणेकरांनी पहिल्या दिवसापासून गर्दी केली आहे.
फणी आळी तालीम ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कसबा पेठ गणेश रस्त्यावरील मंडळाचे यंदा ८१ वे वर्ष आहे. मंडळाने जीवंत ऐतिहासिक देखावा सादर करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. शिवशाहीचा शिरस्ता अर्थात टोपीकर इंग्रज यांना शासन हा देखावा सादर केला आहे. गणेश रस्ता, कसबा गणपतीजवळ, अध्यक्ष : ओंकार काळे
मानाचा पहिला कसबा गणपती
मानाचा पहिला श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाने यंदा काथ्या, बांबू, शेण, सुतळी आणि द्रोणातून साकारला पर्यावरणपूरक गणेशोत्सव. मंडळाने यंदा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला आहे. १३४ वर्षांची परंपरा पर्यवरणपूरक सजावटीचा अभिनव उपक्रम साकारला आहे. मंडपात प्रवेश करताच पारंपरिक भारतीय कारागिरीची झलक पाहायला मिळते. सजावटीतील प्रत्येक घटकामध्ये निसर्गातून घ्या आणि निसर्गालाच परत द्या हा विचार अधोरेखित केला आहे. परंपरा जपूया निसर्गही जपूया हा संदेश देणारी ही पर्यावरण पूरक सजावट पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
अध्यक्ष : श्रीकांत शेटे , उपाध्यक्ष : सूरज गाढवे
जनार्दन पवळे संघ
तांबट आळी, कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघाने यंदा नृसिंह आरुढ गणेश मूर्ती... मुंबईतील देखावे आधरित २८ फुटी भव्य देखावा सादर केला आहे.
तांबट आळी, कसबा पेठ उत्सवप्रमुख : राकेश डाखवे
प्रकाश मित्रमंडळ
शिवाजी रस्त्यावरील प्रकाश मंडळाने यंदा फुलांची आकर्षक सजावट सादर केली आहे.
शनिवार वाड्याजवळ, कसबा पेठ, अध्यक्ष : महेश अमराळे
अखिल गुंडाचा गणपती
कसबा पेठ, माणिक चौकातील मंडळाने यंदा वैष्णादेवी गुहा हा देखावा सादर केला आहे. मंडळाचे यंदा ६२ वे वर्ष आहे. मंडळातर्फे दरवर्षी वारकरी भोजन, कीर्तन महोत्सव, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजन करण्यात येते.
अध्यक्ष : निखिल आढाव, उपाध्यक्ष : सिद्धार्थ गुळुंबे, कृष्णा बुऱ्हाडे
श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान (हनुमान क्लब)
मंडळ यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. पुनवडी... हा देखावा सादर केला आहे. सिमेंटच्या जंगलात लुप्त होत चाललेल्या वास्तू आताच्या पिढीला कळाव्यात, या संकल्पनेतून जुने पुणे हा देखावा सादर केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा १५० फूट लांब व ७५ फूट बाय ३५ फूट भव्य देखावा आहे. पुण्याची वेस, चावडी, तालीम, हौद, मारुती मंदिरे, नदीवरील घाट, जुने वाडे, भिडे वाडा, कसबा गणपती, भाऊ रंगारी, जुन्या सुवर्ण पेढ्या, भव्य हेमांडपंथी मंदिर असा दाखविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. सदर देखावा पाहताना गणेशभक्तांना जुन्या पुण्यात फिरण्याचा अनुभव येणार आहे.
माणिक चौक, कसबा पेठ. अध्यक्ष : प्रशांत महाडिक, उत्सवप्रमुख : अभिजित पाठक, कार्याध्यक्ष : पंकज उंडाळे, तुषार अष्टेकर, उपाध्यक्ष : सूरज रासने, योगेश पाठक, तुषार कर्डे, सचिन पाठक.
नवग्रह मित्रमंडळ
कसबा पेठेतील नवग्रह मित्रमंडळ ७७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळाने यंदा जुन्नर येथील ऐतिहासिक श्री काळभैरवनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे सामाजिक दायित्वाची जाणीव जपत मंडळाने एक वही एक पेन बाप्पाच्या चरणी अर्पण या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे.
शनिवार वाड्यासमोर, शिवाजी रस्ता, कसबा पेठ अध्यक्ष : पांडुरंग बलकवडे, उत्सवप्रमुख : अनिकेत मुंदडा
आवर्जून पाहावेत असे देखावे...
१) श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान (हनुमान क्लब) - माणिक चौक, कसबा पेठ.
२) नवग्रह मित्रमंडळ - शनिवार वाड्यासमोर, शिवाजी रस्ता, कसबा पेठ
३) फणी आळी तालीम ट्रस्ट - गणेश रस्ता, कसबा गणपतीजवळ
४) जनार्दन पवळे संघ - तांबट आळी, कसबा पेठ