

सुपे: पाटस येथून सुप्याकडे विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस सुपे घाटातील पहिल्या वळणावर बुधवारी (दि. १६) सकाळी साडेसातच्या सुमारास उलटली. बसमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करीत होते. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दररोज सकाळी सात वाजता पाटस येथून ही बस कुसेगाव, पडवी, गायकवाड मळा आदी मार्गे सुप्याकडे येते. बुधवारी सकाळी सुपे घाटातील पहिल्या वळणावर बस चढ चढत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस मागे सरकली आणि रस्त्याच्या कडेला उलटली झाली. बसने एक पलटी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी तातडीने बसमधून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. या घटनेत चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील यांनी दिली. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्परतेने दखल घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित प्रशासन व रुग्णालयाशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्याची माहिती राजकुमार लव्हे यांनी दिली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही घटनेची माहिती मिळताच प्रशासनाला आवश्यक सूचना केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. तसेच जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पालकांकडून एसटीच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर पालकांनी शालेय वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. एसटी बस डेपोतून बाहेर पडण्यापूर्वी वाहन परीक्षकांकडून ब्रेक, इंजिन, टायर, हॉर्न यांसह सर्व तांत्रिक बाबींची नियमित तपासणी केली जाते का, याची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसचा दररोजचा सुरक्षा तपासणी अहवाल ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. सुपे घाटातील धोकादायक वळणावर कठडे, सुरक्षा उपाययोजना व आवश्यक संरक्षण व्यवस्था करण्याची मागणीही पालकांकडून करण्यात आली आहे.
‘आज शाळेत गेलो नसल्याने अपघातून वाचलो’
दरम्यान, इयत्ता तिसरीतील साईराज सुनील चोरमले हा विद्यार्थी बुधवारी पायातील शूज घेण्यासाठी वडिलांसोबत गेला होता. त्यामुळे तो नेहमीच्या बसने शाळेत गेला नव्हता. ‘आज मी वडिलांसोबत गेलो असल्याने अपघातातून बचावालो अशी भावना त्याने व्यक्त केली.