Traffic Congestion Pudhari
पुणे

Pashan Chowk Traffic Congestion: पाषाण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर; तीन पर्यायी मार्गांचा प्रस्ताव

सकाळ-सायंकाळ दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; चौकाचे रुंदीकरण, वाहतूक बेट आणि पर्यायी रस्त्यांसाठी निधीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पाषाण गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक कोंडीने नागरिकांचा प्रवास त्रासदायक झाला असून, सकाळी आणि सायंकाळी या चौकात दररोज एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. ही कोंडी फोडण्यासाठी चौकाचे रुंदीकरण, ग्रेड सेपरेटर आणि वाहतूक बेट उभारण्यासह तीन पर्यायी मार्ग विकसित करण्याची मागणी पुढे आली आहे.

यासाठी डीआरडीओ आणि संरक्षण विभागाच्या जागेची संमती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नगरसेविका मयूरी कोकाटे आणि रत्नमाला सातव यांनी स्थायी समितीकडे पत्राद्वारे केली आहे. पाषाण चौकातील वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर रोजी प्रकल्प प्रमुख दिनकर गोजारे, पथ विभागप्रमुख राजेश बनकर आणि अधीक्षक अभियंता रमेश वाघमारे यांच्यासह संयुक्त पाहणी करण्यात आली.

या वेळी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली. चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी डीआरडीओच्या जागेची संमती घेऊन ग्रेड सेपरेटर उभारणे, चौकाचे रुंदीकरण करणे आणि वाहतूक बेट विकसित करणे, असे उपाय सुचविण्यात आले आहेत. याशिवाय संरक्षण विभागाच्या हद्दीलगत निम्हण मळामार्गे सोमेश्वरवाडीला जोडणारा पर्यायी रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

महापालिका अंदाजपत्रकात निधीची तरतूद करावी

या कामांसाठी डीआरडीओ आणि संरक्षण विभागाच्या आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निम्हण मळ्यातील बाधित नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देत रस्ता विकासाची प्रक्रिया सुरू करावी आणि या कामांसाठी २०२६-२७च्या महापालिका अंदाजपत्रकात निधीची तरतूद करावी, असेही पत्रात नमूद केले आहे.

पुलाचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

निम्हण मळा ते सुस रोडला जोडणारा २४ मीटर रुंदीचा प्रस्तावित विकास आराखड्यातील (डीपी) रस्ता आणि राम नदीवरील पुलाचे प्रलंबित कामही तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे मार्ग कार्यान्वित झाल्यास पाषाण चौकातील वाहतुकीचा भार विभागण्यास मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT