

शंकर कवडे
पुणे: पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने रविवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गत आठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने घटली. बाजारात राज्यासह परराज्यातून ८० ते ९० ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. मागणीच्या तुलनेत आवक कमी राहिल्याने मिरची, ढोबळी मिरची, वांगी, शेवगा, घेवडा आणि मटारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली.
मार्केट यार्डातील बटाटा विभागात पुणे व सातारा परिसरातून बटाटे दाखल होण्यास सुरवात झाली आहे. परराज्याच्या बरोबरीने स्थानिक बटाटे बाजारात दाखल होऊ लागले आहे. रविवारी बाजारात ४५ ते ५० ट्रकमधून बटाटा विक्रीसाठी दाखल झाला. यामध्ये, पाच ते सहा टेम्पो आवक स्थानिक भागातून झाली. त्यातुलनेत मागणी नसल्याने बटाट्याच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. तर, पितृपक्षामुळे नैवैद्यासाठी लागणार्या गवार, भेंडी, तांबडा भोपळा, कारले, काकडी या फळभाज्यांना मागणी कायम असून त्यांसह उर्वरित फळभाज्यांचे दरही स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ५५० गोणी, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेट्स, हिरवी मिरची ४ टेम्पो, काकडी ६ ते ७ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, मटार २०० ते ३००, घेवडा २ ते ३, पावटा २ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, कांदा सुमारे १०० टेम्पो इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ३५०-४३०, बटाटा : ८०-२००, लसूण : ६००-२०००, आले (सातारी) : ७५० - १७५०, भेंडी : ३००-५००, गवार : ५००-६५०, टोमॅटो : १५०-२००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : ६००-६५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २५०-३००, काकडी : २००-२५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ६०-१००, वांगी : २००-४००, डिंगरी : ४००-४५०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी : ४००-४५०, जाड : २००-२२०, शेवगा : ५००-६५०, गाजर : २००-३००, वालवर : ३००-३५०, बीट : १६०-१८०, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ५५०-६५०, मटार : ८००-१०००, पावटा : ४००-५००, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १४००, सुरण : १८०-२००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्यांचे दर टिकून
मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची सुमारे एक लाख तीस हजार जुडी, तर मेथीची ४० हजार जुडी आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत दोन्हीची आवक २० हजार जुड्यांनी घटली. पितृपक्षामुळे मेथीला चांगली मागणी आहे. आवक जावक कायम असल्याने पालेभाज्यांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीला ३ ते १५ रुपये दर मिळाला, तर किरकोळ बाजारात प्रतिजुडी १० ते २५ रुपयांना विकली जात आहे. पालेभाज्यांचे शेकडयातील भाव : कोथिंबीर : ५००-१५००, मेथी : १५००-२०००, शेपू : १०००-१२००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : १०००-१४००, करडई : ८००-१०००, पुदिना : ४००-८००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : २०००-२५००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ८००-१०००, पालक : १०००-१२००.