Drama Pudhari
पुणे

Pune Parvati Police: पर्वती पोलिसांचा ‌‘प्रकाशवाटा गुन्हेगारी मुक्तीच्या‌’ अभिनव उपक्रम

पथनाट्याद्वारे जनजागृती; विधीसंघर्षीत बालकांना समाजमुखी करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुन्हेगारांना हिरोच्या रूपात आपला आदर्श मानणारी तरुणांची एक पिढीच समाजात गेल्या काही दिवसापासून निर्माण होऊ पाहतेय. ही पिढी स्वतःच्या छोट्या- मोठ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. गुन्ह्यात अडकल्यानंतर बडे गुन्हेगार अशा तरुणांना आश्रय अन्‌‍ पैसा पुरवतात. एकदा का तो सराईत झाला की त्याचा पुढे सोईस्कर वापर केला जातो. पुढे त्यातूनच जन्म होतो तो कथित भाई... दादा... अन्... भाऊंचा..! त्या पार्श्वभूमीवर पर्वती पोलिसांनी अल्पवयीन वयात गुन्हेगारीच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या विधीसंघर्षीत बालकांना परावृत्त करून समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ‌’प्रकाशवाटा गुन्हेगारी मुक्तीच्या‌’ या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे.

समाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांनी तयार केलेल्या पथनाट्यातून विधीसंघर्षीत गुन्हेगारीवर भाष्य करण्यात येत आहे. त्यातून चांगल्या आणि वाईट संगतीचे परिणाम आपल्या कोणत्या ठिकाणी घेऊन जातात हे सांगण्यात आले आहे. पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पर्वती पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेले विधी संघर्षित बालके आणि त्यांचे पालक यांचा मेळावा येथील भीमसेन जोशी सभागृह बागुल उद्यान येथे पार पडला होता.

या मेळाव्यात 35 पेक्षा अधिक विधीसंघर्षीत बालक आणि त्यांच्या पालकांनी हजेरी लावली होती. या वेळी गायकवाड यांनी बालगुन्हेगारी वाढीमागील कारणे कोणती? त्या पासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी. गुन्हेगारीच्या वाटा आपले आयुष्य कसे उद्ध्‌‍वस्त करतात. पालकांची यामध्ये काय भूमिका आहे, याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले.

गायकवाड म्हणाले, बालके ही अनुकरणशील असतात, ती समाजामधील चांगल्या वाईट- गोष्टीचे अनुकरण करतात. त्यामध्ये पालकांची देखील भूमिका महत्त्वाची आहे. विधिसंघर्षित मुले यांचे हातून गुन्हा घडू नये, यासाठी त्यांचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच, या बालकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह-पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोड, पोलिस उप-आयुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक किरण पवार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT