वेल्हे: गेल्या दोन आठवड्यांपासून पानशेत परिसरात सराईत चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. चोरट्यांनी विजेची सहा रोहित्रे (डीपी) फोडून त्यातील 15 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे. रोहित्रचोरीमुळे राजगड व मुळशी तालुक्यातील आठ गावांसह वरसगाव धरण, पानशेतच्या पर्यटन केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पानशेत वरसगाव परिसरात एकापाठोपाठ एक रोहित्र फोडून किमती तेल, तांब्याच्या तारा आदी मौल्यवान साहित्य रातोरात चोरून चोरटे पसार होत आहेत. चोरट्यांच्या हैदोसामुळे महावितरण कंपनी तसेच ग््राामीण पोलीस हतबल झाले आहेत.
पानशेतजवळील डावजे ( ता. मुळशी) येथील विजेची दोन रोहित्रे चोरट्यांनी फोडून त्यातील लाखो रुपयांचे साहित्य चोरून नेले. डावजे रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दोन चोरटे दिसत आहेत. याबाबत पानशेत विभाग महावितरण कंपनीचे शाखा अभियंता युवराज इंदलकर यांनी डावजे येथील रोहित्रचोरांचे सीसीटीव्ही फुटेज पौड पोलिसांना दिले आहेत.
रोहित्रचोरीच्या फिर्यादी वेल्हे व पौड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप चोरटे सापडले नाहीत. वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांनी चोरट्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. पानशेतच्या कुरवटी येथील पानशेत पर्यटन केंद्र व वरसगाव धरणाची दोन, आंबेगाव बुद्रुक येथील दोन व डावजे येथील दोन असे सहा रोहित्र फोडून चोरट्यांनी त्यातील तांबे व किमती ऑईल चोरून नेले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित होत झाला आहे.
महावितरण कंपनीचे तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पानशेत विभागाचे शाखा अभियंता युवराज इंदलकर म्हणाले, रोहित्र ( डीपी ) चोरीमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. नागरिकांनी आपल्या गावातील डीपीवर रात्री पहारा द्यावा. चोरट्यांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे. रात्रीच्या वेळी डीपीजवळ अनोळखी व्यक्ती किंवा वाहने फिरताना दिसल्यास पानशेत वीज केंद्र 7875760945 , वेल्हे पोलीस ठाणे 02130221233/112 व वीज कंपनीचा ग््रााहक सेवा टोल फी क्रमांक* 1800-233-3435/191 या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार आहेत.