

जेजुरी: तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपरिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. 78.6 टक्के मतदान झाले. निकाल लांबल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दिनांक 21 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आता उमेदवारासहित सर्वांनाच निकालाची उत्कंठा लागली आहे, आणि मतांच्या गणितावर चर्चा रंगू लागली आहे.
जेजुरी नगरपरिषदेची निवडणूक अर्थपूर्ण होते, हे जगजाहीर आहे. या निवडणुकीत प्रचंड अर्थकारण झाले. या अर्थकारणामुळे उमेदवार जेरीस आले होते. निवडणूक लढविणे सर्व सामन्यांचे काम नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बाहेरील मतदारांनी आणि अनेक स्थानिक मतदारांनी अक्षरशः जादा अर्थाची मागणी करून लोकशाहीची ऐशी की तैशी करून टाकली. हे आता थांबायला हवय, अशी प्रतिक्रिया उमेदवारांसह सुज्ञ मतदारांनी व्यक्त केली. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी 15 हजार 800 मतदान होते. यापैकी 12 हजार 333 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत आठ टक्के मतदानाची घट झाली. ही घट कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालानंतर स्पष्ट होईलच.
2 डिसेंबर रोजी मतदान झाले 3 नगराध्यक्षपदाचे व 50 नगरसेवकपदासाठीच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले. जेजुरी नगरपरिषदेच्या मल्हार नाट्यगृहात अतिशय कडक बंदोबस्तात ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या आहेत. आता उमेदवारांसह कार्यकर्ते व नागरिक मतदानाची आकडेमोड करीत आहेत. कोणाला किती मतदान होईल, कोण विजयी होईल, कोणाचा पराभव होणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, कोण होणार कारभारी याबाबत सर्वत्र चर्चा रंगत आहेत.
भाजपा, राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा गट, आणि काँग््रेास या पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही शिवसेना व काँग््रेासला उमेदवार मिळाले नाहीत. शिवसेना शिंदे गटाला केवळ चार, उबाठाला गटाला दोन तर काँग््रेासला केवळ एक उमदेवार मिळाला. जेजुरीच्या राजकारणात या निवडणुकीनंतर या तिन्ही पक्षांचे किती अस्तित्व राहील याबाबत शंका आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्षपद व नगरसेवकपदासाठी 53 उमेदवारांनी निवडणूक लढवली. प्रत्येकाला आपण विजयी होणार असा आत्मविश्वास आहे पण, खात्री नाही. त्यातच मतमोजणी लांबणीवर पडल्याने उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत. उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.