

पौड: कोळवण ते काशिग मार्गावरील रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कामाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निकृष्ट कामाबाबत कडक शब्दांत इशारा दिला आहे.
या मार्गावर पुढील महिन्यात जागतिक दर्जाची सायकल स्पर्धा होणार आहे. यासाठी कोळवण ते काशिग या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. मात्र, यात दर्जा राखला जात नाही. काही ठिकाणी मातीवरच डांबरीकरण केल्याची माहिती आहे.
याबाबत माहिती मिळताच मुळशी तालुकाप्रमुख सचिन खैरे यांनी कामाची पाहणी केली. त्यांनी तेथील काम थांबविले. फक्त सायकल स्पर्धेकरता रस्ता न टिकता पुढील काळातही हा रस्ता चांगला राहावा आणि दर्जेदार काम करण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला दिली. तसेच निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य राम गायकवाड, स्थानीय लोकाधिकार समितीचे नामदेव टेमघरे, संभवे गावचे उपसरपंच प्रशांत जोरी, नितीन लोयरे उपस्थित होते.