

बारामती: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये गुरुवारी (दि. 11) पार पडलेल्या लिलावप्रक्रियेत गहू, ज्वारी, बाजरी या धान्याच्या बाजारभावात काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले, तर कडधान्यांचे दर मात्र स्थिर राहिले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी धान्ये, कडधान्ये व इतर अशा 2451 क्विंटल मालाची आवक झाली. सध्या शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणी आणि इतर बाबींमध्ये व्यस्त असल्याचा परिणाम बाजार समितीतील आवकेवर होताना दिसून आला.
समितीमध्ये गुरुवारी काळ्या उडदाची 88.80 क्विंटल आवक झाली. त्याला किमान 4800 ते कमाल 5950, तर सरासरी 5601 रुपये क्विंटल असा दर मिळाला. खपली गव्हाची 13.20 क्विंटल आवक झाली. खपली गव्हाला चांगला दर मिळतो आहे. समितीमध्ये गुरुवारी किमान 5 हजार ते कमाल 5600 व सरासरी 5600 रुपये असा दर खपली गव्हाला मिळाला. याउलट 2189 व लोकवन या वाणाचे दर काहीसे घसरल्याचे दिसून आले. 2189 वाणाच्या गव्हाची 170 क्विंटल आवक झाली. त्याला किमान 2711 ते कमाल 3175 रुपये व सरासरी 2851 रुपये दर मिळाला.
लोकवन गव्हाची 254 क्विंटल आवक झाली. त्याला किमान 2500 ते कमाल 2751 रुपये व सरासरी 2700 रुपये दर मिळाला. गुळाची 28.70 क्विंटलची आवक झाली. गुळाचा दर सरासरी 4 हजार रुपये क्विंटल असा राहिला, तर घेवड्याला 3550 रुपये सरासरी असा दर मिळाला. हायबीड ज्वारीची 179 क्विंटल आवक झाली. किमान 2200 रुपये ते किमान 3300 रुपये व सरासरी 3200 रुपये असा दर राहिला. गावरान ज्वारीची 118 क्विंटलची आवक झाली. गावरान ज्वारीला 3 हजार रुपये किमान ते 3900 रुपये कमाल व 3500 रुपये सरासरी असा दर मिळाला.
महिको बाजरीची 132 क्विंटल आवक झाली. किमान 2600 रुपये ते कमाल 3400 रुपये व सरासरी 2800 रुपये दर मिळाला. हायबीड बाजरीची 197.40 क्विंटल आवक झाली. किमान 1800 रुपये ते कमाल 2700 रुपये व सरासरी 2650 रुपये दर मिळाला. तांबड्या तुरीची 21.60 क्विंटलची आवक झाली. किमान 4500 रुपये ते कमाल 6152 रुपये व सरासरी 6126 रुपये असा दर राहिला. पांढर्या तुरीची केवळ 4 क्विंटल आवक झाली. 4150 रुपये किमान ते 4500 रुपये कमाल व सरासरी असे दर निघाले.
पांढऱ्या मकाची अवघी 1.80 क्विंटल आवक झाली. किमान 1800 रुपये ते कमाल 2600 रुपये व सरासरी 2351 रुपये दर मिळाला. तांबड्या मकाची 1174.80 क्विंटल आवक झाली. किमान 1551 रुपये ते कमाल 1911 रुपये व सरासरी 1851 रुपये असा दर मिळाला. याशिवाय गरडा हरभऱ्याला सरासरी 4900 रुपये पांढऱ्या व जाड्या हरभऱ्याला सरासरी 5 हजार रुपये असा दर मिळाला. मूग व साळ यांचीही अल्प आवक समितीमध्ये झाली.