वडगाव निंबाळकर: चांगला दर मिळेल या आशेवरच बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा विक्री केला आहे. सध्या चाळीतील कांदाविक्री अंतिम टप्प्यात आली आहे. गेली नऊ महिने चाळीत ठेवलेला उन्हाळी कांदा आता संपत आला आहे. या महिनाअखेरीस तो संपेल. त्यानंतर ग््रााहकांना नवीन कांद्यावरच समाधान मानावे लागणार आहे.
आज भाव वाढेल, उद्या भाव वाढेल, या आशेवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात कांदा चाळीत टाकलेला होता. हा कांदा गेले नऊ महिने शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेवर जतन केला. परंतु शासकीय धोरण, निर्यात बंदी, मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन, यामुळे गेले वर्षभर कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल आहे.
कांदा उत्पादनासाठी केलेला खर्चही निघाला नाही. एक एकर कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी कांदा लागवड, मजुरी, बेसल डोस, कांदा रोपे, रासायनिक खते, सरासरी चार औषध फवारण्या, कांदा काढणी मजुरी, वाहतूक, साठवण असा सरासरी 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत खर्च जातो. पिकवलेल्या कांद्याच्या एका पिशवीला सर्व खर्च वजा करून एक हजार रुपये मिळाले तरच शेतकऱ्याच्या हातात चार पैसे उरतात. अन्यथा कायम पदरमोड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
उसाप्रमाणेच कांदा हे नगदी पीक गणले जाते. परंतु अलिकडील काळात लॉटरीसारखा खेळ या पिकाचा झाला आहे. मिळाले पैसे तर मिळाले, नाही तर कवडीमोल दराने तो विकावा लागत आहे. तरीही आज ना उद्या चांगला दर मिळेल या आशेवर शेतकरी जुनी कांदा चाळ रिकामी करत नवीन हंगामाची तयारी सुरू केली आहे.
महिला वर्गाकडून घरच्या घरीच कांदा कटाई सुरू
कांद्याचे भाव कोसळल्याने बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. उत्पादन खर्च परवडत नसल्याने बाजारात कांदा विकताना तोट्याला सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मजुरीवर खर्च करणेही परवडेनासे झाले असून घरातील महिलाच शेतात उतरून कांदा कटाई करत आहेत. काही शेतकऱ्यांनी तोटा टाळण्यासाठी तयार झालेला कांदा जागेवरच सोडून दिला आहे, तर काहींनी रोटाव्हेटर फिरवून पीक खरडून टाकत त्या ठिकाणी अन्य पिके घेण्याचा मार्ग अवलंबला आहे. या परिस्थितीमुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.
मोरगावचे शेतकरी दिलीप नेवसे यांनी सांगितले की, ‘1 एकर कांदा लागवडीसाठी बियाणे 4 हजार, मशागत 5 हजार, खते 5 हजार आणि मजुरी 10 हजार असा खर्च केला. मात्र किलोला फक्त 5 रुपये दर मिळत असल्याने हे पीक तुटीत जात आहे.’
मजुरी महाग असल्याने घरच्या महिलांनीच शेतात उतरून कांदा कटाई करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फुलाबाई नेवसे आणि कांचन नेवसे यांनी सांगितले की, ‘घरकामासोबत शेतीची जबाबदारी पार पाडत कुटुंब आर्थिक संकटातून बाहेर पडावे यासाठी आम्ही स्वतः काम करत आहोत.’ मजुरी दरवाढ, वाहतूक खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे खर्च निघणे कठीण बनले आहे. परिणामी ग््राामीण भागात महिलांचा कष्टमय सहभाग अधिक स्पष्टपणे समोर येत आहे. कांद्याला स्थिर दर, हमीभाव मिळावा आणि बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.