

पुणे: भोंदुगिरीद्वारे कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील पंढरपूरकर दाम्पत्यासह एका आरोपीला 3 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केलेली मागणी सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी मान्य केली. आरोपींच्या वेगवेगळ्या 39 बँक खात्यांपैकी 13 बँकांची माहिती समोर आली असून, त्यात सुमारे 1139 विविध संशयित बँक व्यवहार दिसून येत आहेत. तसेच त्यांनी फिर्यादी व इतरांकडून घेतलेले सोने काही खासगी सावकारांकडे गहाण ठेवून सुमारे 60 लाखांचे कर्ज घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय 41), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय 42, दोघेही रा. महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (वय 65, रा. जय शंकर फार्म हाऊस, वाडीवरे, नाशिक) या तिघांना गुरुवारी प्रॉडक्शन वॉरंटवर न्यायालयात हजर केले होते. आरोपींनी 2018 ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान मुलीचा आजार बरा करण्याचा बहाणा करून फिर्यादीची 13 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी घेतल्यानंतर पोलिस कोठडीचा हक्क अबाधित राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. पोलिस कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपींचे विविध खाती, वाहने व लॅपटॉप यातून 54 लाख रुपयांची रक्कम जप्त व संरक्षित करण्यात आली. फिर्यादी व विविध बँक खाती यांच्याकडे चौकशी दरम्यान गुन्ह्यात फसवणूक झालेली रक्कम वाढलेली असून, ती 14 कोटी 39 लाख 20 हजार रुपये इतकी झाली आहे.
आरोपीची 39 बँक खात्यांची माहिती मागवली आहे. त्यापैकी 13 बँक खात्यांची माहिती मिळाली असून त्यात 14 कोटी 39 लाख रुपयांची रक्कम विविध ठिकाणी फिरवली आहे. त्यातून आरोपींनी काही मालमत्ता, वाहने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैसे वेळोवेळी फिरवून फसवणूक केलेल्या रकमेची वासलात लावल्याचे दिसून येत आहे.
विशेष नोंदणी व महानिरीक्षक यांच्याकडून सुमारे 6 ते 7 विविध नोंदणी व त्याचे दस्त प्राप्त झालेले असून, त्याचा आरोपीकडे तपास करायचा आहे. सावकाराकडे सोने गहाण ठेवून 60 लाखांचे कर्ज घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे सोने कोणत्या सावकाराकडे गहाण ठेवले आहे, त्याची आरोपीकडे चौकशी करायची आहे.
आरोपींना 3 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
आरोपींनी गुन्ह्यातील रक्कम मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपात काढली असून, त्याची विल्हेवाट कोठे लावली, याचा तपास करायचा आहे. फिर्यादी व्यतिरिक्त इतर साथीदारांची सुद्धा फसवणूक झालेली असून, त्यांची रक्कम व सोने कोठे ठेवले याबाबत तपास करायचा आहे. आरोपींनी फसवणूक केलेली रक्कम ज्यांना दिलेली आहे, त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड व इतर डिटेल्स अटकेतील आरोपींना माहिती असून, त्यांची चौकशी करून ते प्राप्त करायचे आहेत. यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष खतेमाळस यांनी 6 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. फिर्यादीकडून ॲड. विजयसिंह ठोंबरे आणि सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी काम पाहिले.