पुणे

फक्त सर्व्हिस रस्ता नको; ‘दिंडी मार्ग’च हवा !

backup backup

वडगाव मावळ :  गणेश विनोदे :

स्थानिकांना वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व्हिस रस्त्यासह वर्षानुवर्षे याच रस्त्याने प्रवास करणार्‍या वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी मुंबई-पुणे महामार्गालगत फक्त सर्व्हिस रस्ता नाही, तर दिंडी मार्गच होणे अत्यंत आवश्यक व भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

मावळ तालुक्याच्या मध्यभागातून मुंबई पुणे महामार्ग गेला असून एका बाजूला पवनमावळ तर दुसर्‍या बाजूला नाणेमावळ व आंदरमावळ हे ग्रामीण भाग आहेत.

याशिवाय खंडाळा, लोणावळा, वाकसई, कार्ला, शिळाटने, कामशेत, नायगाव, कान्हे, साते, जांभूळ, ब्राम्हणवाडी, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, सोमाटणे ही मोठ्या लोकवस्तीची गावे व शहरे महामार्गाच्या दुतर्फा आहेत.

त्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यातील नागरिक दैनंदिन कामासाठी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करत आहेत, द्रुतगती महामार्गावर ज्याप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जाते तसे या महामार्गावर केले जात नाही, परिणामी अपघात घडतात व यामध्ये या मार्गाने दुचाकीने प्रवास करणार्‍या स्थानिकांनाच जास्त धोका आहे.

आतापर्यंत प्रामुख्याने सोमाटणे, वडगाव, ब्राम्हणवाडी, साते, कान्हे या परिसरात अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून कित्येकांचा जीव गेला आहे. त्यामुळे या भागात तर सर्व्हिस रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु, रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

दरम्यान, स्थानिकांच्या दृष्टीने सर्व्हिस रस्ता गरजेचा असला तरी साते फाट्याजवळ नुकत्याच घडलेल्या दिंडीतील वारकर्‍यांच्या दुर्घटनेचा विचार केला तर फक्त सर्व्हिस रस्ताच नको तर दिंडी मार्ग होणे आवश्यक असल्याची बाब पुढे आली असून 'दै.पुढारी'ने ही गरज शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

'दिंडी मार्ग' या दृष्टिकोनातून रस्ता केला, तर तो काही ठराविक ठिकाणी न होता दिंडीच्या संपूर्ण मार्गावर होऊ शकेल. तसे झाल्यास जवळपास संपूर्ण मावळ तालुक्याच्या हद्दीत खंडाळा ते वडगाव फाट्यापर्यंत व तेथून देहू फाट्यापर्यंत रस्ता होईल व त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न सुटेल.

याशिवाय दिंडी मार्ग म्हणून रस्ता झाल्यास तो दर्जेदार सर्व सोयींयुक्तही होईल, विशेषतः या संकल्पनेतून झाला तर जागोजागी निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, प्रथमोपचार व्यवस्था आदी सुविधा मिळू शकतात. तसेच दिंडी सोहळ्याच्या वेळी पोलीस बंदोबस्ताचीही जास्त गरज पडणार नाही.

त्यामुळे स्थानिक नागरिकांचा दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने व वारकर्‍यांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेऊन शासनाने मुंबई पुणे महामार्गलगत दिंडी मार्ग करावा अशी मागणी दै.पुढारीच्या या वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर जोर धरू लागली आहे.(समाप्त)

तर..जैन साधू-संतांचाही प्रश्न सुटेल !

जैन समाजाचे साधू-संत याच मुंबई-पुणे महामार्गाने वर्षातील आठ महिने प्रवास करत असतात, त्यांचा प्रवास शक्यतो पहाटेच्या वेळी असतो.

ते प्रवास करताना संबंधित गावातील जैन बांधव त्यांची काळजी घेतात, परंतु, शेवटी हा महामार्ग असल्याने सर्वांनाच जीव धोक्यात घालून चालावे लागते. त्यामुळे दिंडी मार्ग झाल्यास या रस्त्याने प्रवास करणार्‍या जैन साधू-संतांचाही प्रश्न सुटू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT