Nira River Water Release Pudhari
पुणे

Nira River Water Release: नीरा नदीत पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको; विखे-पाटलांसोबत सोमवारी बैठक

इंदापूर-माळशिरसच्या शेकडो शेतकऱ्यांचे सराटी बायपासवर आंदोलन; वीर-भाटघर धरणातून पाणी सोडण्याची मागणी, सकारात्मक निर्णयाचे जलसंपदामंत्र्यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

बावडा: नीरा नदीमध्ये भाटघर-वीर साखळी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर सराटी (ता. इंदापूर) बायपास येथे शुक्रवारी (दि. १३) सुमारे ३ रास्ता रोको आंदोलन केले. यासंदर्भात पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत सोमवारी (दि. १६) बैठक होणार आहे.

या आंदोलनामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा.धैर्यशील मोहिते पाटील, आ.उत्तमराव जानकर, माजी आ. रणजितसिंह मोहिते पाटील आदी सहभागी झाले होते.

इंदापूर व माळशिरस तालुक्याचे सीमेवरून वाहणारी नीरा नदी अनेक महिन्यांपासून कोरडी पडलेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. सध्या नदीकाठच्या गावांमध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न तीव्र बनला आहे. त्यामुळे वीर-भाटघर साखळी धरणातून नदीमध्ये पाणी सोडून सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना विखे-पाटील यांनी, निरा नदीमध्ये पाणी सोडणे संदर्भात लोकप्रतिनिधी, कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

याप्रसंगी मदनसिंह मोहिते पाटील, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, हनुमंत कोकाटे, उदयसिंह पाटील, भरत शहा, मयूरसिंह पाटील, मनोज पाटील, पंडितराव पाटील, महादेव घाडगे, मनोज जगदाळे, आण्णासाहेब कोकाटे, दत्तात्रय घोगरे, पंजाबराव भगत, प्रतापराव पाटील, नवनाथ रुपनवर, अण्णा पवार, किरण पाटील, रणजीत वाघमोडे, संतोष कोकाटे, राजेंद्र कुरळे, अमर भोसले, रोहित जगदाळे, अनिता खरात, दयानंद गायकवाड आदींसह दोन्ही तालुक्यातील शेकडो शेतकरी व महिला, जलसंपदाचे अधिकारी उपस्थित होते. आभार श्रीमंत ढोले यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT