नीलेश-सचिन गायवळसह मकोका तपास गुन्हे शाखेकडे वर्ग Pudhari Photo
पुणे

Nilesh Ghaywal: नीलेश-सचिन गायवळसह मकोका तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

कोथरूड पोलिसांकडून मकोका कारवाईतर्फे गुन्ह्यांचा तपास आता गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांकडे, विदेशात फरार आरोपीवर लूकआऊट नोटीस

पुढारी वृत्तसेवा

पुणे : गुंड नीलेश गायवळ उर्फ घायवळवर केलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी (मकोका) कारवाईचा तपास आता कोथरूड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (दि.10) दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.(Latest Pune News)

सध्या या प्रकरणाचा तपास कोथरूड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्याकडे होता. यापूर्वी गायवळ याच्या घरी आणि कार्यालयात पोलिसांनी छापे टाकून जमिनीच्या संदर्भातील साठेखत, खरेदीखत जप्त केली आहेत. तर घरात पिस्तुलाची काडतुसे मिळून आल्याप्रकरणी आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी कोथरूड पोलिस ठाण्यात नीलेश याचा मोठा भाऊ सचिन गायवळ याच्यासह सात जणांच्या विरुद्ध दहा सदनिका बळकावल्याबाबत एका व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे त्याचे पिस्तूल परवान्यासंदर्भातील गृहराज्यमंत्र्यांचे शिफारस प्रकरणदेखील चांगलेच चर्चेत आले आहे. सचिन याच्यावर देखील मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

कोथरूड परिसरात अलीकडेच गायवळ टोळीतील गुंडांनी एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने वार करत दोन व्यक्तींवर हिंसक हल्ला केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत नीलेश गायवळ यालाही आरोपी केले असून, एकूण दहा जणांवर मकोका कारवाई केली आहे. पोलिसांकडून गायवळचा शोध घेतला जात असताना, तो 11 सप्टेंबरपासूनच परदेशात फरार आहे. सध्या गायवळ विदेशात असून, तो अद्याप भारतात परतलेला नाही. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी देशातील महत्त्वाच्या विमानतळावर लूकआऊट नोटीस बजावली आहे.

धुमाळविरुद्ध मकोका कारवाई

नीलेश गायवळचा जवळचा साथीदार गुंड संतोष धुमाळ याच्याविरुद्ध पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. धुमाळ याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे 21 गुन्हे दाखल आहेत.

‌‘पासपोर्ट रद्द करा‌’

कोथरूडमध्ये किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी परदेशात पळून गेलेला कुख्यात आरोपी निलेश गायवळला अटक करायची असल्याने पासपोर्ट रद्द करण्याची मागणी पुणे पोलिसांनी शुक्रवारी विशेष ‌‘मकोका‌’ न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने गायवळचा पासपोर्ट रद्द करण्याबाबत कायद्यातील तरतुदींची माहिती देण्याचे आदेश सरकार पक्षाला दिले. या प्रकरणात मयूर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय 29), मयंक ऊर्फ माँटी विजय व्यास (वय 29), आनंद अनिल चांदलेकर (वय 24, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड), गणेश सतीश राऊत (वय 32) आणि दिनेश राम फाटक (वय 28, दोघे रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड) यांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT