

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने यंदाही फटाक्यांच्या स्टॉल्सचा ऑनलाइन लिलाव आयोजित केला होता. या लिलाव प्रक्रियेतून महापालिकेला तब्बल 83 लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. एकूण 192 स्टॉल्सपैकी 125 स्टॉल्सचा यशस्वी लिलाव झाला असून 67 स्टॉल्स विक्रीअभावी राहिले.(Latest Pune News)
महानगरपालिकेने शहरातील 13 ठिकाणी फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया राबवली. शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळील नदीकाठावर असलेल्या स्टॉल्सना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी 40 स्टॉल्ससाठी बोली लावण्यात आल्या, ज्यापैकी सर्वाधिक बोली 69 लाख रुपये इतकी होती.
लिलाव झालेल्या ठिकाणांमध्ये शनिवार पेठ रिव्हरसाईड, कोंढवा खुर्द (अग्निशमन केंद्र), हडपसर, धानोरी, कोथरूड, कात्रज, पर्वती, धायरी, खराडी, बालेवाडी, हडपसर (सीझन मॉल), वारजे (आरएमडी कॉलेज) आणि लोहेगाव या परिसरांचा समावेश आहे.
महानगरपालिकेने 2023 पासून फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी ऑनलाइन लिलावाची पद्धत सुरू केली असून, ही प्रक्रिया प्रशासनासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे अधिकारी सांगतात. यंदा मिळालेले उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत अधिक असून, लिलाव प्रक्रियेला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.