पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळ याने पोलिसांना देखील आपल्या शब्दच्छलात अडकविल्याचे पुढे आले आहे. घायवळ याची ‘गायवळ’ नावाचा उल्लेख असलेली कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली असून, तेच त्याचे खरे आडनाव आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (Latest Pune News)
गायवळ अडनाव असूनही त्याने पुणे पोलिसात गुन्हा दाखल झाला तेव्हा स्वत:चे नाव ‘घायवळ’ असे सांगून पोलिसांची दिशाभूल केली. त्यामुळे तेव्हापासून तो सर्वांचीच दिशाभूल करीत आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पासपोर्टच्या वेळी पोलिस पडताळणीत त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड कदाचित समोर आले नसावे.
कोथरूड परिसरात अलीकडेच घायवळ टोळीतील गुंडांनी दोन व्यक्तींवर हिंसक हल्ला केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये कट आढळल्याच्या आरोपाखाली टोळीप्रमुख नीलेश घायवळ यालाही आरोपी करण्यात आले असून, एकूण दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून घायवळचा शोध घेतला जात असताना, तो 11 सप्टेंबरपासूनच परदेशात असल्याची माहिती समोर आली. मकोकाच्या एका गुन्ह्यात जामीन देताना न्यायालयाने त्याला पासपोर्ट जमा करण्याची सूचना केली होती.
घायवळला परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट मिळालाच कसा, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात असताना, घायवळने अहिल्यानगरच्या पत्त्यावर पासपोर्ट काढल्याची माहिती समोर आली. तो पासपोर्ट काढताना त्याने ‘गायवळ’ नावाने प्रक्रिया केल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला त्याने बनावट नावाने पासपोर्ट काढला, अशी चर्चा झाली. मात्र, पुणे पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आधार कार्ड आणि त्याची काही अन्य कागदपत्रे मिळाली. त्यात ‘नीलेश गायवळ’ असे त्याचे नाव असल्याचे दिसून आले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
पुणे पोलिसांचा अहिल्यानगरममध्ये छापा
घायवळने पासपोर्ट काढताना अहिल्यानगरमधील निवासी पत्ता दिला आहे. त्या ठिकाणी पुणे पोलिसांनी दसऱ्याच्या दिवशी छापा टाकला. या वेळी तो पत्ता खोटा असल्याचे समोर आले. पोलिसांनी याबाबत अहिल्यानगर पोलिसांकडून त्याच्या अनुषंगाने माहिती घेतली.
घोषणापत्रात खोटी माहिती
नीलेश घायवळने पासपोर्ट काढताना अर्जासोबत घोषणापत्र दिले होते. त्यात त्याने त्याच्यावर राज्यात कोठेही गुन्हा दाखल नसल्याची खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिस पडताळणीबाबत त्यामध्ये तसा कॉलम समाविष्ट करण्यात आलेला असतो. त्यामध्ये त्याने गुन्हे दाखल नसल्याचा उल्लेख केला आहे.
नोटिशीला उत्तर नाही
घायवळने पासपोर्ट तत्काळ श्रेणीत काढला होता. त्यावेळी पासपोर्ट मिळाल्यानंतर घायवळचे पोलिस व्हेरिफिकेशन झाले. त्यात तो पत्त्यावर उपलब्ध नसल्याचा शेरा देण्यात आला होता. त्यामुळे व्हेरिफिकेशन न झाल्याने पासपोर्ट विभागाने घायवळला नोटीस बजावली होती. त्या नोटीशीलाही त्याने उत्तर न दिल्याची माहिती समोर आली आहे.
पाय खोलात, पासपोर्ट रद्द होणार
नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. घायवळने खोट्या माहिती आधारे पासपोर्ट मिळवला आहे. त्यामुळे ही कारवाई केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (तीन डिसेंबर) पोलिस आयुक्त अमिकेश कुमार यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. दरम्यान घायवळचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावर याबाबत कारवाई होऊ शकते.