

मंचर : तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथील ऋषी पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवून चार चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी पेट्रोलपंपाच्या काउंटरमधील १ लाख ९० हजार ३७० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याबाबत आकाश मच्छिंद्र डोके यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.(Latest Pune News)
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तांबडेमळा (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतील ऋषी पेट्रोल पंपावर रात्री ९.३० वाजताचे दरम्यान दुचाकीवर आलेले दोन चोरटे पेट्रोलपंपाच्या ऑफिसमध्ये घुसले तर दोघेजण बाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबले होते. आत आल्यावर चोरट्यांनी आतील कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखले. बाहेरील कर्मचाऱ्याला आत नेले. पिस्तूलचा धाक दाखवून चोरट्यांनी कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी केली.
घाबरलेले कर्मचारी हात वर करून उभे राहिले. त्यावेळी त्यातील एका चोरट्याने ड्रॉवर उचकण्यास सुरुवात केली. यावेळी चोरटे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. पैसे काढून द्या नाहीतर जीवे मारू, असे म्हणून चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १ लाख ९० हजार ३७० काढून घेवून बाहेर आले. चौघेही चोरटे एकाच मोटरसायकलवर आले होते. चोरी करून परत चालत जाताना १५० मीटर अंतरावर पंपावरील कर्मचारी पकडतील या भीतीने त्यातील एका चोरट्याने हातातील पिस्तुलाने हवेत गोळीबार केला.
त्यामुळे कर्मचारी घाबरले. चौघेही चोरटे मोटरसायकलवरून नारायणगावच्या दिशेने फरार झाले. घटनेची माहिती कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.