पुणे: नीट पेपरफुटी प्रकरणात सातत्याने वाढत असलेल्या विरोध आणि आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिला. गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनामुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला. यातूनच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे अखेर झुरळांनी करून दाखवले, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी संघटना तसेच शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी दिली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीने नीट परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांवर असल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील या मुद्द्यावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. २३ जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले, तरी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा अभिजित दीपके यांनी केली होती. अखेर प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आंदोलन थांबवले आहे. केंद्र सरकारने या राजीनाम्याची औपचारिक घोषणा केली असून, पुढील शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती लवकरच होण्याची शक्यता आहे. नीटसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नवीन मंत्री काय पावले उचलणारय, याकडे विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागले आहे.
सरकारला विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करावा लागला
‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंदोलक विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधण्याचा सल्ला दिला होता. त्याचवेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनाही सरकारशी चर्चा करण्यास सांगितले होते. दोन्ही बाजूंनी संवादाचा मार्ग स्वीकारल्यामुळेच आंदोलनावर तोडगा निघाला आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा देशातील तरुणाईच्या संघर्षाचा विजय असून सरकारला विद्यार्थ्यांच्या भावनांपुढे झुकावे लागले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘नीट’ पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लोकशाहीत संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. विद्यार्थ्यांवर लाठीमार, पोलिसी कारवाई किंवा दडपशाही करण्याऐवजी त्यांच्याशी थेट चर्चा करावी, संवाद टाळल्यास परिस्थिती अधिक चिघळू शकते, असे आपण मोदींना सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
त्याचप्रमाणे आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके आणि इतर आंदोलनकर्त्यांनाही सरकारशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये दोन फेऱ्यांत चर्चा झाली. चार प्रमुख मागण्यांपैकी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकार सुरुवातीला ठाम होते. स्वतः पंतप्रधान मोदी यांनीही प्रधानांचा राजीनामा होणार नसल्याचे आपल्याला सांगितले होते. मात्र, देशभर उसळलेल्या जनआक्रोशामुळे अखेर सरकारला आपली भूमिका बदलावी लागली आणि प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला, असे पवार यांनी सांगितले.
मी कोणाला मदत केली, हा मुद्दा नाही; प्रश्न सुटला हे महत्त्वाचे
पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याबद्दल होत असलेल्या टीकेलाही पवार यांनी उत्तर दिले. ‘मी कोणाला मदत केली, हा मुद्दा नाही. प्रश्न सुटला, हे महत्त्वाचे आहे. संवादातून तोडगा निघत असेल तर तीच योग्य भूमिका आहे,’ असे ते म्हणाले.
जनक्षोभाची जाणीव सरकारला झाली
आंदोलनाचा राजकीय परिणाम काय होईल, या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे या आंदोलनाचा त्यावर काय परिणाम होईल, याबाबत आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र, जनक्षोभाची जाणीव सरकारला झाली, असे ते म्हणाले.
गुडलक चौकात 'सीजेपी'चा जल्लोष
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या (सीजेपी) कार्यकर्त्यांनी शनिवारी डेक्कन येथील गुडलक चौकातील (नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक) कलाकार कट्ट्यावर जल्लोष केला. या वेळी वाहनचालक आणि नागरिकांना मेलडी चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी 'सीजेपी'कडून देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले होते. शुक्रवारीही पुण्यात यासंदर्भात मोठे आंदोलन झाले. त्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यामुळे गुडलक चौकात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. या चौकातून जाणाऱ्या वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मेलडी चॉकलेट वाटून आनंद व्यक्त केला. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.