

पुणे: शहरात गत सहा दिवसांत झालेल्या संततधार पावसाने बहार आणली आहे. टेकड्या आणि जंगले हिरवीगार झाली आहेत. मात्र, ठिकठिकाणी चिखल साचला असून, झाडपडीचे सत्र अजूनही सुरूच आहे. धरणातून आलेल्या पाण्यामुळे नदीपात्र फुगल्याने प्रवासी मेट्रोतून त्याचे विहंगम दृश्य मोबाईलमध्ये टिपत आहेत.
शहरात ३० जूनपर्यंत फक्त
३६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर १ ते ९ जुलैदरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हंगामातील एकूण पाऊस ३२० मिमीपर्यंत गेला होता. मात्र, त्यानंतर दहा दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे पुन्हा पाऊस पडतो की नाही, याची चिंता निर्माण झाली होती.
मात्र, हवेचे दाब अनुकूल होताच २० जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह शहर आणि परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शहराचा हंगामातील पाऊस ५३० मिमीपर्यंत नोंदला गेला.
झाडपडी अन् चिखलाचे साम्राज्य...
शहरात जागोजागी चिखल झाला आहे. तसेच, झाडपडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील जंगल आणि टेकड्यांवर याचे प्रमाण जास्त आहे. तळजाई टेकडी, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, चतुःशृंगी, बाणेर-पाषाण, रामटेकडी, एनडीए परिसर, एआरएआय टेकडी या ठिकाणी अशीच स्थिती संततधार पावसामुळे झाली आहे.
शनिवारी हलक्या पावसाची नोंद...
शनिवारी सकाळी उघडीप मिळाली; मात्र दुपारी हलक्या सरींनी पुणेकरांना पुन्हा भिजवलेच. शहरात सरासरी १ ते २ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, रविवारी घाटमाथ्याला रेड, तर सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पावसाचा मुक्काम वाढला आहे. अधूनमधून उघडीप आणि हलका पाऊस, असे संमिश्र वातावरण ३१ जुलैपर्यंत राहणार आहे.