राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्‍छुक उमेदवारांच्या मुलाखती शहरातील पदाधिकारी घेताना. Pudhari
पुणे

Pune Municipal Election: मनपा रणधुमाळीला सुरुवात; राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघांतून २५२ इच्छुकांच्या मुलाखती; निवडणूक तयारीत आघाडी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहरात आघाडी घेतली आहे. शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांतून तब्बल २५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सकाळी १० पासून सुरू झालेला मुलाखतींचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

या मुलाखती शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापूसाहेब पठारे, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार अशोक पवार, जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, भगवानराव साळुंखे, डॉ. सुनील जगताप, नीलेश निकम, विशाल तांबे, काकासाहेब चव्हाण, अश्विनी कदम यांच्यासह शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.

पुणे महापालिकेच्या निवडणुका १५ जानेवारीला होणार आहे. शरद पवार स्वतः पुणे निवडणुकीत लक्ष घालत असून, त्यांनी डिसेंबरच्या सुरुवातीलाच पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता.

मुलाखतीदरम्यान उमेदवाराचा संबंधित प्रभागातील जनसंपर्क, पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्यासोबत राहिलेले निष्ठावान कार्यकर्ते, प्रभागातील जातीय समीकरणे आणि पक्षाची ताकद, माजी नगरसेवक किंवा सामाजिक कार्यातील सहभाग आदींची माहिती या मुलाखतीदरम्यान जाणून घेण्यात आली.

राजकीय समीकरणे आणि युती

सध्या शरद पवार गट, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याने आघाडीबाबत अद्याप पेच कायम आहे. त्याचबरोबर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार आणि अजित पवार गट) एकत्र येणार का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

इच्छुक उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

मनपा निवडणुकीत काही प्रभागांतील इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली. शिवाजीनगर मतदारसंघाच्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांने हलगी वाजवत कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले, तर काही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT