

पुणे : त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन विकासकामे गुणवत्तापूर्ण, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७ – गर्दी व्यवस्थापन व सोई-सुविधा) याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे ग्रामीणचे उपअधीक्षक दिलीप शिंदे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहने, भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, महसूल, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि देवस्थान यांच्यात समन्वय ठेवून कामकाजाचे सविस्तर नियोजन करावे. पोलीस प्रशासनाने वाहतूक नियोजन व गर्दी व्यवस्थापनाबाबत स्पष्ट आराखडा सादर करावा, तसेच नियंत्रण कक्ष उभारण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
भाविकांच्या सोयीसुविधांचा विचार करता रस्त्यांचे सर्वेक्षण करून आवश्यक कामांचे अंदाजपत्रक तयार करावे, पाणीपुरवठा विभागाने पुरेसे पाणी उपलब्ध होईल याची खात्री करावी, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी (एसटीपी) सुधारित आराखडा तयार करून मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
निगडाळे येथील भाविक सुविधा केंद्र आणि वाहनतळाची कामे पूर्ण करणे, तसेच भाविकांच्या निवासासाठी टेंट सिटी उभारण्याच्या दृष्टीने वाहनतळ वगळता इतर ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीत तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे बलीदानस्थळ, वढू बुद्रुक येथील समाधी स्मारक, जेजुरी गड तीर्थक्षेत्र, राजमाता सईबाई स्मृतीस्थळ, सदुंबरे येथील संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, कुरवंडे येथील टायगर व लायन्स पॉइंट, हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ परिसर विकास तसेच अष्टविनायक गणपती मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.
भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे गतीने पूर्ण करावीत, येत्या पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होतील असे नियोजन करावे आणि कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचाही विचार करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अतिक्रमणे असल्यास तातडीने हटवावीत आणि सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.