

पुणे : वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे शेवटचे तीन दिवस राहिले असून, नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन पुस्तक खरेदीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि पुणे लिटरेचर फेस्टिव्हलचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारपर्यंत (दि. 21 डिसेंबर) आयोजित केला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवात मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांतील साहित्य उपलब्ध असून, कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, आत्मचरित्रे, चरित्रग्रंथ, वैचारिक साहित्य, संशोधनपर पुस्तके तसेच शालेय आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.
लहान मुलांसाठी उभारलेला चिल्ड्रेन कॉर्नर हे महोत्सवाचे आकर्षण ठरत आहे. कविसंमेलने, पुस्तक प्रकाशन, अनुभवी लेखक आणि नवोदित साहित्यिकांमधील संवाद तसेच विद्यार्थी आणि तरुणांसाठी प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. पुणे लिट फेस्टिव्हलमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, 'बुकर' पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक, ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर, अभिनेता सचिन पिळगावकर, अभिनेत्री गिरीजा ओक आदींचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.