राष्ट्रीय कला उत्सवातील पुरस्कारविजेत्या विद्यार्थ्यांसह अन्य मान्यवर. Pudhari
पुणे

National Arts Festival: सहभागी प्रत्येक विद्यार्थी हा विजेताच

राष्ट्रीय कला उत्सवाचा जल्लोषपूर्ण समारोप; सचिव संजय कुमार यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने पार पडलेला हा कला उत्सव येथे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरला आहे. काहींना या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत.

परंतु, यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी आज जिंकलेला असून, तो विजेताच आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

राष्ट्रीय कला उत्सव २०२५च्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. कलेला प्राधान्य देणाऱ्या या उत्सवाच्या आयोजनासाठी त्यांनी राज्य शासनाचे, एनसीईआरटी आणि यशदाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून विद्यार्थी आपल्या कल्पकतेने शिकतील, असेही संजय कुमार म्हणाले.

यावेळी केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, एनसीईआरटीच्या विभागप्रमुख प्रा. ज्योत्स्ना तिवारी आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, एकमेकांच्या कलासंस्कृतीची देवाण-घेवाण करणे हाच खरा `एक भारत, श्रेष्ठ भारत` आहे. आगामी काळात तुम्ही ही प्रतिभा जगभरात घेऊन जाल आणि यशस्वी व्हाल, अशी अपेक्षा आहे. देओल म्हणाले, प्रत्येकासाठी हा एक वेगळा अनुभव होता. दिल्लीच्या बाहेर पहिल्यांदाच हा कला उत्सव इतक्या सुंदरप्रकारे साकार झाला. कला उत्सव हे तुमच्यासाठी एक व्यासपीठ होते. तुम्ही जगभरात तुमची कला पोहोचवाल, याची मला खात्री आहे.

कला आपल्या संस्कृतीचा प्राण आहे. अशा कार्यक्रमांना शासनाकडून देखील चांगले प्रोत्साहन मिळत आहे. ही आनंदाची बाब आहे. परंतु, येथे आलेला विद्यार्थी कलाकार एनसीईआरटीसोबत आयुष्यभर जोडला गेला पाहिजे, अशी अशी इच्छा एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी व्यक्त केली.

यावेळी संगीत गायन (समूह), संगीतवादन, तालवाद्य अशा विविध १२ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. स्वरूपा बने आणि प्रिया मोर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रियंवदा तिवारी यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT