

शेळगाव : शेळगाव (ता. इंदापूर) येथील मनीषा मल्हारी खोमणे (वय ३५) या महिलेच्या डोक्यात जबर प्रहार करून पती मल्हारी रोहिदास खोमणे (वय ३७) याने खून केल्याची घटना घडली आहे.
ही घटना मंगळवारी (दि. २३) पहाटे घडली. या खुनाच्या घटनेने शेळगावसह इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या पतीस वालचंदनगर पोलिसांनी सहा तासांत जेजुरी येथून अटक केली आहे.
या घटनेप्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शेळगाव गावठाण येथे मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मनीषा खोमणे अंघोळीसाठी जात होत्या. त्या वेळी संशयित आरोपी पती मल्हारी खोमणे याने पाठीमागून त्यांच्या डोक्यात लाकडाच्या साहाय्याने जोराचा प्रहार केला. या हल्ल्यानंतर महिलेचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेनंतर नातेवाइकांनी जखमी महिलेला तत्काळ इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पतीने पत्नीचा खून का केला? हे कारण अद्याप समजू शकले नाही. आरोपी पती व मृत पत्नीच्या घरी मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र अवैधरीत्या बनावट दारूची विक्री केली जात होती. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती.
आरोपी मल्हारी खोमणे याच्यावर वालचंदनगर पोलिस ठाण्यात यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या घटनेची माहिती वालचंदनगरचे पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलिस उपनिरीक्षक रतीलाल चौधर, पोलिस कर्मचारी गुलाब पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संशयित आरोपी पती मल्हारी खोमणे याला शोधण्यासाठी माळेगाव, जेजुरी, नातेपुतेसह अन्य दिशेने पथके रवाना केली होती. घटनेच्या सहा तासांनंतर त्याला जेजुरी (ता. पुरंदर) येथील चव्हाणवस्ती येथून अटक केली.
पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलिस हवालदार दादासाहेब डोईफोडे, पोलिस कर्मचारी जगदीश चौधर, शैलेश स्वामी, गणेश वानकर यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला शिताफीने पकडून वालचंदनगर पोलिस ठाण्यात हजर केले.