Snake Rescue Pudhari
पुणे

Naugpanchami Snake Rescue: गारुड्यांची पेटारी गेली; सर्पमित्रांची रेस्क्यू बॅग आली! नागपंचमीच्या परंपरेत मोठा बदल

कायद्याच्या कडक अंमलबजावणीने नागांचे खेळ बंद; पुण्यात सर्पमित्रांकडून आता बचाव आणि पुनर्वसनावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात एकेकाळी नागपंचमीच्या दिवशी गारुडी नागांचे खेळ दाखवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले. गारुडी गायब झाले असून, आता त्यांची जागा सर्पमित्रांनी घेतली आहे. आजचा सर्पमित्र नागाला कमाईचे साधन न मानता बचावाची जबाबदारी म्हणून पाहतो. त्यामुळे गारुड्याच्या पेटाऱ्याची जागा आता सर्पमित्राच्या रेस्क्यू बॅगने घेतली आहे.

यंदा पहिल्याच श्रावणी सोमवारी नागपंचमी आली आहे. दि. १७ रोजी नागपंचमी हा पहिला सण आहे. पूर्वी नागपंचमीला घरोघरी गारुडी जाऊन नागाचे खेळ दाखवत असत. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे नागाला पकडून ताब्यात ठेवणे किंवा त्याचा खेळ दाखवणे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा आहे.

पुणे वन विभागाने यापूर्वी नागपंचमीच्या काळात गारुड्यांकडून नाग पकडण्याच्या प्रकाराविरोधात नागरिकांना आवाहन केले होते. नागांना दूध पाजणे, त्यांचे दात काढणे किंवा तोंड शिवणे, यासारख्या क्रूर प्रथा प्राण्यांसाठी घातक असल्याचेही वन विभागाने स्पष्ट केले होते. त्याबाबत कठोर कारवाई होताच गारुडी दिसणेच बंद झाले. त्यांनी दुसरे रोजगार शोधले. हा मोठा सामाजिक बदल वन कायद्यांमुळे झाला आहे.

गारुडी गेले; सर्पमित्र आले...

सर्पमित्रांची भूमिका वन्यजीव बचावाची झाली आहे. महाराष्ट्र वन विभागाने सर्प बचाव आणि सुटकेसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार करून प्रत्येक बचावाची नोंद ठेवण्याची आणि वन विभागाशी समन्वय साधण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरासह ग्रामीण भागात असे शेकडो सर्पमित्र कार्यरत आहेत.

बंडगार्डन येथील पंपिंग स्टेशनमध्ये आढळलेला सँड बोआ हा साप सर्पमित्रांनी सुरक्षित बाहेर काढला. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या बचाव केंद्रातही दरवर्षी विविध भागांतून हजारोहून अधिक सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी उपचार व पुनर्वसनासाठी येतात. दहा ते बारा वर्षांपूर्वीच पुण्यात नागपंचमीच्या दिवशी गारुड्यांची संख्या अत्यंत कमी झाल्याचे वन अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

गारुडी गायब झाले, याची अनेक कारणे आहेत. वन कायदे कडक झाल्याने त्यांना शिक्षा होऊ लागली. त्याच वेळी रोजगाराच्या संधी वाढल्याने गारुड्यांनी दुसरे रोजगार स्वीकारले. तिसरा सामाजिक बदल स्मार्टफोन आल्याने समाज माध्यमांनी केला. साप दिसला, गारुडी दिसला की तो तत्काळ पकडला जाऊ लागला.
मनोज बारबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT