

चाकण: चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून शासन प्रशासन हलले आहे. चाकणमधील याच असुविधांबाबत रविवारी (दि. १६) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. चाकण एमआयडीसीमधील रस्ते, पाणी, वीज, कचरा, वाहतूक कोंडी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर शासनाकडून ठोस निर्णय घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत महामार्गावरील सगळे खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीमधील येलवाडी, सावरदरी आदी भागांत रस्त्यांची पाहणी करून चाकणमधील उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. कारखान्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करून उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूककोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात, या सगळ्या त्रासाला कंटाळून २० लघुउद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमध्ये आले होते. या वेळी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सगळे खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत (व्हीसीद्वारे) ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत म्हणाले. वाहतूक कोंडीबाबत शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म निर्णय घेतल्याची माहिती मंत्री सामंत यांनी बैठकीनंतर दिली. आरएमसीसारखे मटेरियल वापरून शॉर्ट टर्ममध्ये खड्डे बुजवले जातील, असेही ते म्हणाले. अनेक रस्ते मंजूर झालेत, जे कंत्राटदार वेळेत काम करीत नाहीत, त्यांना ब्लॅक लिस्ट केले जाईल. घनकचरा प्रश्न महत्त्वाचा आहे. आम्ही त्यासाठी जागा देतोय. पीएमआरडीएचे (PMRDA) त्याबाबत टेंडरही निघाले असल्याचे सामंत म्हणाले.
दरम्यान, मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. केवळ मंत्री किंवा अधिकारी येऊन पाहणी करून जाणे हा सरकारचा उद्देश नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. केवळ पाहणी नव्हे, तर निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. चाकण येथील स्थानिक आणि उद्योजकांना १०० टक्के न्याय मिळेपर्यंत प्रशासन कटिबद्ध राहील, असा विश्वास देखील उद्योगमंत्र्यांनी चाकणमधील बैठकीत व्यक्त केला.
या बैठकीस खा.अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योगांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी चाकणमधील समस्या आणि त्यांचे निराकरण कसे करता येईल, याबाबत सविस्तर विश्लेषण मंत्री आणि उद्योजकांसमोर केले.
एकत्रित प्रयत्नातून समस्या सोडवा: उपमुख्यमंत्री शिंदे
चाकणमधील बैठकीत व्हीसीद्वारे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने उद्योगांच्या समस्या सोडवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. चाकण पालिकेचा डीपीआर तातडीने मंजूर करून येथील समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. 'चाकणमधून उद्योग जाणार' अशी वृत्ते माध्यमांमध्ये येत असून, ती महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहचवणारी आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्रित प्रयत्नाने चाकणमधील समस्या सोडवण्याचे आवाहन देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.