

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध इलेक्ट्रिक वस्तू व उपकरण खरेदीत घोटाळे झाल्याचा आरोप करणारे एक निनावी पत्र काही निवडक व्यवस्थापन परिषद सदस्यांना पाठविण्यात आले आहे. या पत्रात विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापकावर भ्रष्टाचाराचे विविध आरोप करण्यात आले आहेत. परंतु पत्र निनावी असल्याने विद्यापीठ याची दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
विद्यापीठात बसवण्यात आलेले अनेक सीसीटिव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ बसवण्यात आलेले काही कॅमेरे बंद आहेत. निनावी पत्रात कंत्राटदाराला हाताशी धरून कॅमेरे जुन्याचे नवे केले गेले, असा आरोप करण्यात आला आहे. त्यातच फायबर ऑप्टिकल केबल दुरुस्ती प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप या पत्रात आहे.
टेक्निकल कमिटीची दिशाभूल करून हा घोटाळा केल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा सर्वात मोठा घोटाळा खड्डे काढून त्यामध्ये नुसतीच केबल पुरली, काही ठिकाणी नुसतेच खड्डे काढले आणि जुनीच केबल पुरली, त्याची जोडणी अद्याप केलेलीच नाही. मुळात गरज नसताना केवळ मोठी रक्कम मिळवण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प विद्यापीठाच्या गळी उतरवला.
विद्यापीठातील इंटरनेट आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी यांची दुरवस्था आजही तशीच आहे. विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा घोटाळा केला गेला. फायबर केबलची लांबी, त्याचा प्रकार, इतर माहिती आणि बाजारातील किंमत हे सर्व पाहता खूप मोठा आर्थिक अपहार झाला आहे. विद्यापीठास सर्व माहिती असताना सुद्धा काहीही कारवाई होत नाही, याचा खेद वाटतो, असेही या पत्रात नमूद केले आहे.
काही व्यवस्थापन परिषद सदस्यांना पाठविण्यात आलेले निनावी पत्र हे विद्यापीठातील प्रमुख अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवले आले होते. परंतु नेहमी प्रमाणे त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आरोप असलेल्या व्यक्तीने परदेश दौरे, देशांतर्गत सहली आणि परदेशी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची फी भरणे, भेटवस्तू स्वीकारणे अशा स्वरूपात कंत्राटदाराकडून मोबदला घेतला आहे, असाही आरोप या पत्रात केला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासनाने निनावी पत्र असल्यामुळे दुर्लक्ष केले असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित निनावी पत्रातील आशय तपासून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
डॉ. प्रफुल्ल पवार, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ