PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: मुठा कालवा परिसर ‘डम्पिंग ग्राऊंड’; मूलभूत सोयींचा आजही अभाव

कचरा, राडारोडा, अनियमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि वाढती गुन्हेगारी — जनता वसाहत व हिंगणे खुर्द परिसरातील नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

शहर आणि उपनगरांच्या सीमेवर असलेल्या जनता वसाहत-हिंगणे खुर्द प्रभागात कष्टकरी मजूर, सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सोसायट्या, वीज केंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्प हे मोठे प्रकल्पही याच भागात आहेत. असे असले तरी मूलभूत सोयीसुविधांचा या प्रभागात अभाव असून, वर्षानुवर्षे जुन्या समस्याही कायम आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळे मुठा कालव्याच्या सीमाभिंतीसह नाला संरक्षितीकरणाचे काम रखडले असून, कचऱ्यामुळे परिसराला ‌‘डम्पिंग ग्राउंड‌’चे स्वरूप आले आहे.

प्रभागात पाणी, ड्रेनेज, नालेसफाई, स्वच्छता, वाहतूक आदी समस्या आहेत. अनेक भागांत आजही पाणीपुरवठा अनियमित होत आहे. काही ठिकाणी जुन्या आणि फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. तर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत आहे. कालवा रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेची समस्या गंभीर झाली आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. खड्डे पडल्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दांडेकर पूल, दत्तवाडी येथील चौकांसह परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याचीच झाली आहे. पार्किंगची व्यवस्था अपुरी असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. मुख्य सिंहगड रस्त्यावर सायंकाळच्या वेळेस अनधिकृत पथारी व्यावसायिक आणि भाजी विक्रेते बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

प्रभागात महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची कमतरता असून, सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी होत आहे. तसेच, क्रीडांगणाची देखील गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असून, आहे त्यांचीही दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी कालवा रस्ता परिसरात अंधार असतो. जनता वसाहत परिसरात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जुन्या वादांसह किरकोळ कारणांमुळे टोळक्यांकडून वारंवार रस्त्यांवर लावलेल्या वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना गेल्या काळात घडल्या आहेत. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास हल्ला करणे, कोयते हवेत नाचवत दहशत निर्माण करणे, महिला आणि अल्पवयीन मुलींची छेडछाड काढणे, अशा गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. यामुळे विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जनता वसाहत परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच, परिसरात कचऱ्याची समस्याही गंभीर झाली आहे.
अनिश रेणुसे, रहिवासी

मुठा कालव्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकून जागा डम्पिंग ग््रााउंड बनल्याचे चित्र आहे. तसेच, बांधकामाचा राडारोडाही टाकला जात आहे. सीमाभिंत नसल्याने नागरिकांकडून कालव्यात कचरा टाकला जात आहे. प्रभागाच्या काही भागांत आजही अनियमित पाणीपुरवठा होत आहे. मुठा कालव्याच्या रस्त्यावर वाहतूक सुरू झाल्यापासून परिसरात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. परिणामी, पाणीपुरवठ्यासह पायभूत सुविधांवर ताण येत आहे.

जनता वसाहत परिसरात आरोग्य कोठी, महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती आणि अंतर्गत पदपथांची कामे केली आहेत. उद्यानांमध्ये ओपन जिम, नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ड्रेनेजलाइनसह विविध विकासकामे करण्यात आली आहेत.
अनिता कदम, माजी नगरसेविका

प्रभागातील जुन्या वसाहतींमधील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होणे आणि गळती रोखण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम झाले आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी झाला असून, काही भागांतील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. जुन्या पाण्याच्या टाक्यांची दुरुस्तीही करण्यात आली आहे. जनता वसाहत आणि हिंगणे खुर्द परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे झाली आहेत. मुठा कालवा रस्त्याच्या कामांमुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीला एक पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे.

जनता वसाहत, दत्तवाडी परिसरात लाईट हाऊस आणि जनता भवनची निर्मिती केली. अग्निशमन केंद्र उभारण्यासह विविध विकासकामे केली आहेत.
प्रिया गदादे, माजी नगरसेविका

अनेक ठिकाणी जुने पथदिवे बदलून नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत. नागरिकांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बहुउद्देशीय हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि आवश्यक ठिकाणी डिजिटल क्लासरूम तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दत्तवाडी, जनता वसाहत या ठिकाणी वाचनालये उभारण्यात आली आहेत.

प्रभागात या भागांचा समावेश

जनता वसाहत, दत्तवाडी, पानमळा, नवश्या मारुती मंदिर परिसर, हिंगणे खुर्दचा काही भाग, विश्रांतीनगर, विठ्ठलवाडी आदी.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, लहुजी वस्ताद साळवे बहुउद्देशीय हॉल, पुस्तकघर, लाईट हाऊस केंद्राची निर्मिती केली आहे. प्रभागात विविध विकासकामे केली आहेत.
आनंद रिठे, माजी नगरसेवक

प्रभागातील प्रमुख समस्या

  • सिंहगड रस्त्यावर अनधिकृत पथारी व्यावसायिक,

  • भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण

  • दांडेकर पूल, दत्तवाडी येथील चौकांत होणारी वाहतूक कोंडी

  • अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा

  • काही ठिकाणी जलवाहिन्यांची दुरवस्था झाल्याने गळती

  • पार्किंगचा अभाव असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर

  • महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची कमतरता

  • जनता वसाहत परिसरात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ

  • मुठा कालव्याच्या परिसरात कचऱ्याचे ढीग

प्रभागात झालेली विकासकामे

  • मुठा कालवा रस्ता झाल्याने सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग

  • वाचनालये, सांस्कृतिक हॉल, लाईट हाऊसची निर्मिती

  • नवीन जलवाहिन्यांमुळे काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत

  • जनता वसाहत, हिंगणे खुर्द परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे

  • रस्त्यांवरील जुने पथदिवे बदलून नवीन पथदिवे बसविले

  • महापालिकेच्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी

  • दत्तवाडी, जनता वसाहत या ठिकाणी वाचनालयांची उभारणी

राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकाची नियमितपणे देखभाल, स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी कचरा, झुडपे आणि गवत वाढत आहे. महापुरुषांच्या नावाने स्मारक उभे केले जातात. मात्र, प्रशासन त्याचे पावित्र्य जतन करण्यासाठी जागरूक नाही.
शिवाजी निवंगुणे, रहिवासी

जनता वसाहतीतील पुनर्वसन रखडले

जनता वसाहतीतील सुमारे 48 एकरच्या भूखंडावरील नागरिकांच्या पुनर्वसनाचे (एसआरए) प्रकरण सध्या पुण्यात वादाच्या केंद्रस्थानी आहे. हा भूखंड ताब्यात घेऊन मोबदल्यापोटी तब्बल साडेसातशे कोटी रुपयांचा टीडीआर देण्याचा घाट घातल्याचा आरोप आहे. या वादग््रास्त भूखंडावर मालकी हक्कावरून न्यायालयीन खटले सुरू आहेत. इतकेच नव्हे, तर काही प्रकरणांमध्ये या जागेच्या जप्तीची टांगती तलवार आहे. या प्रकरणातील अनियमिततेमुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करून वादग््रास्त टीडीआर निर्णयाला स्थगिती दिली असून, संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT