

बारामती: बारामती तालुका व शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत राहिल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत. रस्त्यांची उखडलेली स्थिती, धुळीचे सामाज्य, खड्डे आणि सुरक्षेचा पूर्ण अभाव यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांपासून ग््राामीण भागातील आंतर रस्त्यांपर्यंत सर्वत्र असंख्य कामे अपूर्ण असल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू करून ती अर्धवट सोडण्यात आली आहेत. अनेक रस्ते खडीसकट उघडे पडले असून खोल खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे.
सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहनचालक, विद्यार्थी आणि शेतकरी यांना रोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात सस्तेवाडी, मगरवाडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता उखडलेला असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना रस्ता चुकवून बाजूने जाण्याची वेळ येत असून अपघातांची संख्या वाढली आहे. या भागातील रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे सांगितले. तांदूळवाडी रस्ता तसेच बारामती बायपास रस्त्यांची कामे जवळपास थांबलेली आहेत.
उघड्या खडीमुळे उचललेली धूळ शहरात आरोग्याचा मोठा प्रश्न बनली आहे. दिवसभर धुळीचा भडका उठतो, श्वास घेणे कठीण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना खोकला, डोळ्यांची जळजळ वाढली आहे. काम सुरू असूनही साइटवर कुठेही आवश्यक सुरक्षेची साधने नाहीत. साईड पट्ट्या खचल्या आहेत. कोणतेही चेतावणी फलक नाहीत. रात्री अंधारात वाहने थेट खड्ड्यात घसरण्याचे प्रकार घडत आहेत. बॅरिकेड्स, सिग्नल, परावर्तक पट्टे नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
नागरिक, स्थानिक व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला अशा सर्वच स्तरांतून याबाबत तीव नाराजी व्यक्त केली जात आहे. अर्धवट कामे करून रस्ते त्याच स्थितीत सोडण्यात आले आहेत. त्यातून धूळ आणि खड्ड्यांचा त्रास प्रचंड वाढला आहे. संबंधित विभागाने तत्काळ कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली जात आहे. वाहतूक कोंडी, अपघात, धुळीमुळे वाढलेले आरोग्याचे प्रश्न यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.