

पुणे: पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवायचे आहे. हा उद्देश जगभरातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम येत्या 9 डिसेंबरला मोठ्या उत्साहात संपूर्ण पुण्यात राबविण्यात येणार असून, त्यात पहिल्यांदाच विश्वविक्रम प्रस्थापित होणार आहे. या उपक्रमात 5 लाखांपेक्षा अधिक पुणेकर पुस्तक वाचून विश्वविक्रमाचा भाग होणार आहेत.
या उपक्रमात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिक आणि सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे पुस्तक महोत्सव आणि नॅशनल बुक ट्रस्टने (राष्ट्रीय पुस्तक न्यास) केले आहे.
एनबीटीच्या वतीने पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या 13 ते 21 डिसेंबर या कालावधीत होत आहे. या अनुषंगाने ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम येत्या 9 डिसेंबरला सकाळी 11 ते 12 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सरकारी-खासगी व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांपासून ते वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सहभागी होता येणार आहे. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, कुलगुरू, डॉक्टर, वकील, पत्रकार, लेखक, साहित्यिक, शिक्षक, मुख्याध्यापक असे सर्वच आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन करणार आहेत.
शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय, ग््रांथालय, धार्मिकस्थळे, सरकारी व खासगी कार्यालये, विद्यापीठे, बसस्थानक, रेल्वेस्थानक अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी पुस्तकवाचनाचा उत्सव करण्यात येणार आहे. यावेळी आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचायचे आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने नवा विश्वविक्रम करण्यात येणार असून, त्यात सर्व पुणेकरांनी सहभागी व्हायचे आहे. या उपक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, समर्थ युवा फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
पुण्याला पुस्तकांची राजधानी बनविण्यासाठी सर्वांनी ‘शांतता... पुणेकर वाचत आहेत’ यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आहे. या उपक्रमाच्या माहितीसाठी पुणे बुक फेस्टिव्हलच्या सोशल मीडिया हॅण्डलला भेट देण्याचे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
‘शांतता...पुणेकर वाचत आहेत’, हा उपक्रम यंदा 9 डिसेंबरला सकाळी 11 ते 12 या कालावधीत होणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होत, आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे आहे. त्यामुळे पुणेकरांनी वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी आणि जगाच्या नकाशावर पुण्याचे नाव पुस्तकांची राजधानी म्हणून कोरण्यासाठी सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे.
राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव