पुणे : “भारतीय जनता पक्ष हा मोठ्या ताकदीचा पैलवान आहे. त्याचा सामना करण्यासाठी इतर छोटे-छोटे पैलवान एकत्र येत आहेत,” अशी टीका पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीतील जागावाटप आणि भाजपच्या उमेदवारीनिश्चितीबाबत आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. बैठकीनंतर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येत असल्याबद्दल मोहोळ यांना प्रश्न विचारले असता मोहोळ म्हणाले, “भाजपविरोधात सगळे एकत्र येतात. राष्ट्रवादीचे गट एकत्र येत आहेत. त्यांना शुभेच्छा. पण, पुणेकरांची भाजपला भक्कम साथ आहे, हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दिसून आले. समोरचा पैलवान ताकदवान असल्याने छोटे-छोटे पैलवान एकत्र येत आहेत.”
भाजप-शिवसेना युतीतील जागावाटप आणि भाजपच्या उमेदवारांच्या यादीबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत येत्या दोन दिवसांत बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
पुण्यात भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असून, जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नाराज असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता, अशी कोणतीही गोष्ट नसल्याचा दावा मोहोळ यांनी केला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि निवडणूकप्रमुख गणेश बिडकर हे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.