Contaminated air purification device at Pimpri Chowk. 
पुणे

पिंपरी : चौकांतील प्रदूषणावर महापालिकेचा उतारा

backup backup

दूषित हवा शुद्ध करणार स्वयंचलित यंत्र

पिंपरी : मिलिंद कांबळे : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्यावाढीसोबत दररोज नवीन वाहने रस्त्यांवर उतरत आहेत. अगोदरच औद्योगिक क्षेत्र, त्यात वाहनांचे वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील अधिक वर्दळीच्या चौकात दूषित हवा शुद्धीकरणाचे स्वयंचलित यंत्रे बसविली आहेत.

त्यामुळे अशा चौकात आता शुद्ध हवेचा आनंद वाहनचालकांना तसेच पादचार्‍यांना मिळणार आहे. तसेच, शहरातील मुख्य चौक स्मार्ट केले जात आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला राहण्याजोगे शहर म्हणून पसंती मिळत असल्याने सर्वत्र टोलेेजंग इमारती उभ्या राहून नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहराची सध्याची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे आहे. येत्या दहा ते पंधरा वर्षांत ती 40 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या बरोबरोबरीने वर्षांला हजारो वाहने रस्त्यांवर धावत आहे. औद्योगिकनगरीत वाहनांच्या ध्वनी व वायू प्रदुषणाची मोठी भर पडली आहे.

तसेच, शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी व मुळा या तीन नद्या अतिप्रदूषित होऊन अक्षरश: गटारगंगा झाल्या आहेत. वायू, ध्वनी व जलप्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: श्वसनाच्या व्याधीग्रस्त रुग्ण वाढत आहेत.

त्यावर तत्काळ तोडगा न काढल्यास शहराची अवस्था दिल्ली शहराप्रमाणे बिकट होण्यास वेळ लागणार नाही, असे पर्यावरणप्रेमींनी इशारा दिला आहे.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील मोठ्या प्रमाणात दूषित वायू निर्माण होणार्‍या चौकांची निवड करण्यात आली आहे.
त्या ठिकाणी सीएसआर निधीतून दूषित हवा शुद्ध करण्याचे स्वयंचलित यंत्रे बसविण्यात येत आहेत.

त्यासाठी केवळ वीजजोडणी आवश्यक आहे. ते यंत्र परिसरातील दूषित हवा ओढून घेते आणि ती शुद्ध करून ताजी हवा वातावरणात सोडते.

त्यामुळे दूषित वायूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असा दावा पालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे. यापूर्वी मुंबई, दिल्ली, बेंगळरू शहरात असे यंत्रे बसविण्यात आली आहेत.

शुद्ध हवेसाठी वृक्षसंवर्धन

शहरात शुद्ध हवा असावी म्हणून महापालिकेच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी टेकड्या, मोकळ्या जागा व लष्कराच्या जागा निवडण्यात येत आहेत.

शहरातील विविध भागांत उद्याने विकसित करून वृक्षांची लागवड केली जात आहे. नव्याने विकसित रस्त्यांवरही देशी झाडे लावून त्याचे जतन केले जात आहे.

सन 2017 ची योजना कागदावरच

महापालिकेच्या वतीने जून 2017 मध्ये शहरातील सर्व चौकात आणि गर्दीच्या ठिकाणी वायू शुद्धीकरणाचे तब्बल 100 हून अधिक यंत्रे टप्पाटप्पाने बसविण्यात येणार होते.

त्याचा सर्व खर्च व देखभाल संबंधित कंपनी करणार होती. पालिका केवळ वीजपुरवठा करणार होते. त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिली होती.

पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात यंत्र लावून त्याचे रितसर उदघाटनही करण्यात आले.मात्र, मेट्रोच्या कामासाठी पिंपरी व इतर ठिकाणची यंत्र काढून टाकण्यात आले.

…चौक होणार स्मार्ट

शहरातील चौकात स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्यात सिग्नलच्या दिव्यासह संपूर्ण खांब त्या रंगाच्या एलईडी प्रकाशाने उजाळणार आहे.

त्यामुळे दूर अंतरावरील किंवा गर्दीतील वाहनचालकांला सहजतेने सिग्नल दिसणार आहे. प्रायोगिक तत्वावर पिंपरी चौकात तसे सिग्नल बसविण्यात आले आहेत. तसेच, संपूर्ण शहरातील चौकात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पादचार्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी कठडे तसेच, पांढरे पट्टे मारण्यात येत आहेत. फुलझाडे व हिरवळ करून चौक सुशोभित करण्यात येत आहेत. चौकात डस्टबिनची सुविधा असणार आहे. सर्व चौक भिकारीमुक्त करण्यात येणार आहेत.

दूषित वायू असलेल्या चौकांत यंत्रे बसविणार

महापालिकेच्या सीएसआर विभागाच्या वतीने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील चौकांत तसेच इतर वर्दळीच्या चौकांत दूषित हवा शुद्ध करणारे मशिन बसविण्यात येत आहेत.

पुणे मेट्रोच्या कामासाठी काढून टाकण्यात आलेली यंत्रे पुन्हा नव्याने बसविली आहेत. यंत्राद्वारे तेथील दूषित हवा शुद्ध होत आहे. गरजेनुसार आणखी यंत्रे लावली जाणार आहेत, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT