दीपक सोनवणे
पौड : मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या झालेल्या आरक्षण सोडतीत तसेच पुणे येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीने इच्छुक उमेदवारांच्या मनाप्रमाणे आरक्षण पडल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसून आला. हिंजवडी वगळता इतर पाचही गणांमध्ये इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Latest Pune News)
सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने पौड आणि माण गणात या पदासाठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे. हिंजवडी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या गणातील अनेकांचे सदस्य होण्याचे स्वप्न भंगले. पिरंगुट, भूगाव सर्वसाधारणसाठी खुला झाल्याने येथे निवडणुकीची रंगत पहायला मिळणार आहे. अंबडवेट गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला झाल्याने येथेही मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
तालुक्यात पौड, अंबडवेट, माण, हिंजवडी, पिरंगुट, भूगाव असे सहा गण आहेत. अनुसूचित जातीची संख्या हिंजवडीत सर्वाधिक असल्याने हा गण या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला. अनुसूचित जातीसाठी हा गण राखीव झाल्याने अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडले. अनुसूचित जमातीची लोकसंख्या तालुक्यात अपेक्षित नसल्याने हे आरक्षण टाकले गेले नाही. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी लोकसंख्येनुसार एक जागा निघाल्याने चिठ्ठीतून ही जागा अंबडवेट गणासाठी राखीव झाली.
पौड, माण, पिरंगुट आणि भूगाव हे चार गण सर्वसाधारण वर्गासाठी खुले झाले. त्यात चिठ्ठीतून पौड आणि माण हे दोन गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. सभापतीपदाचे आरक्षणही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या दोन गणांकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे. पिरंगुट आणि भूगाव या दोन गणात सर्वसाधारण वर्गातील इच्छुकांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
पौडच्या सेनापती बापट सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या नियंत्रणाखाली आरक्षण सोडत पार पडली. यावेळी निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, अजय सांवत यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक महिला, पुरुष उपस्थित होते. चिठ्ठ्या काढण्यासाठी पौडच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील काव्या खर्चन, जान्हवी नळेगावे, आरोही चव्हाण आणि सृष्टी भिलारे या चार विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.
जिल्हा परिषदेचे आरक्षण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले. या वेळी मुळशी तालुक्यातील तीनही गटावर पुरुष आरक्षण पडले असल्याने इच्छुकांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. गेले अनेक दिवस केलेली तयारी व पडलेले आरक्षण यामुळे इच्छुक आजपासून प्रत्यक्ष कामाला लागले आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : पौड-अंबडवेट आणि पिरंगुट-भूगाव
सर्वसाधारण : माण-हिंजवडी
पंचायत समिती
गणनिहाय आरक्षण
सर्वसधारण (महिला) : पौड आणि माण
सर्वसाधारण : पिरंगुट आणि भूगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग : अंबडवेट
अनुसूचित जाती महिला : हिंजवडी
जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे आरक्षण पडल्याने इच्छुक उमेदवारांनी भावी सभापती तसेच भावी जिल्हा परिषद सदस्य अशी वाक्ये लिहिलेली डिझाईन करून मुळशी तालुक्यात सोशल मीडियावर लगेचंच झळकवायला सुरुवात केली.